मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 29 December 2022 Live : औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू
Aurangabad Land Scam (HT)

Marathi News 29 December 2022 Live : औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू

Dec 29, 2022, 06:31 PMIST

Marathi News Live Updates : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

Dec 29, 2022, 06:29 PMIST

औरंगाबाद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर, मराठवाड्यात आचारसंहिता लागू

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी आहे. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. निवडणूक जाहीर झाल्यानं मराठवाड्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

Dec 29, 2022, 03:19 PMIST

 Anil Deshmukh : अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा फासला - भाजप

भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचं उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळं महाराष्ट्राची मान लाजेनं खाली गेली आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

Dec 29, 2022, 06:41 AMIST

TET Scam : टीईटी घोटाळ्याप्रकरणी होणार उच्चस्तरीय चौकशी; फडणवीसांचे आदेश

Abdul Sattar TET Scam : राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढले आहेत. टीईटी परिक्षेसाठी अपात्र कंपन्यांना पात्र करण्याचा निर्णय मंत्रालयात झाला होता. हा घोटाळा करण्यास कोणी प्रवृत्त केले, याची चौकशी होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. याशिवाय या चौकशीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dec 29, 2022, 05:33 AMIST

Gautami Patil : चूक दुरुस्त करूनही कार्यक्रमांबद्दल आक्षेप का घेतला जातोय?, गौतमी पाटीलचा संतप्त सवाल

Gautami Patil Lavni Program : लावणी कार्यक्रमांमध्ये पूर्वी माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो. केस मोकळे नसतात. अश्लिल डान्स करत नसतानाही माझ्या कार्यक्रमावर आक्षेप घेण्याचं कोणतंही कारण नाही, असं म्हणत गौतमी पाटीलनं तिच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या संघटनांना सुनावलं आहे.

Dec 29, 2022, 05:33 AMIST

Heeraben Modi : पीएम मोदींच्या आईची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली माहिती

PM Modi Mother Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं अहमदाबादेतील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु आता हिराबेन याची प्रकृती स्थिर असून पीएम मोदी लवकरच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Dec 29, 2022, 05:31 AMIST

Aurangabad : निराधार आरोप मागे घेऊन जलीलांनी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानी खटला भरवणार; सुभाष देसाईंचा इशारा

Aurangabad Land Scam : महाविकास आघाडीच्या काळात तात्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेतील एमआयडीसीच्या जमीनविक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची एसआयटी नेमण्याची मागणीही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. परंतु आता जलीलांनी खोटे आरोप मागे घेऊन त्वरीत माफी मागावी, नाही तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे.

    शेअर करा