मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA World Cup : मोरक्कोकडून पराभव झाल्यानंतर बेल्जियमध्ये हिंसाचार; वाहनांची जाळपोळ, शेकडोंना अटक

FIFA World Cup : मोरक्कोकडून पराभव झाल्यानंतर बेल्जियमध्ये हिंसाचार; वाहनांची जाळपोळ, शेकडोंना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 09:20 AM IST

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषकात मोरक्कोकडून झालेला पराभव बेल्जियमच्या चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. संतापलेल्या लोकांनी बेल्जियममधील रस्त्यांवर उतरत हिंसाचार केला आहे.

Morocco vs Belgium In FIFA World Cup 2022
Morocco vs Belgium In FIFA World Cup 2022 (HT)

Morocco vs Belgium In FIFA World Cup 2022 : सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचे रोमांचक सामने सुरू आहेत. सौदी अरेबियानं अर्जेंटिनाचा पराभव करत विश्वचषकात मोठा उलटफेर केला. त्यानंतर आता दुबळा संघ मानल्या जाणाऱ्या मोरक्कोनंही बेल्जियमला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळं आता फिफा वर्ल्डकपमध्ये फुटबॉलचा रोमांच वाढत असतानाच बेल्जियमचा झालेला पराभव चाहत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला आहे. कारण बेल्जियम फिफामध्ये मोरक्कोकडून हरल्यानंतर अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या हिंसाचारात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र, एका पत्रकारासह अनेक लोक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरक्कोकडून बेल्जियमचा पराभव झाल्यानंतर ब्रुसेल्समध्ये हिंसाचार उसळला. संतापलेल्या लोकांना इलेक्ट्रिक कारसह अनेक स्कूटर्सला आग लावली. याशिवाय लोकांनी दगडफेक केल्याचंही वृत्त आहे. त्यानंतर ब्रुसेल्स पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणात शेकडोंच्या संख्येनं आरोपींना अटक केली आहे. याशिवाय जमावाला शांत करताना पोलीस प्रशासनालाही चांगलाच घाम फुटला. आता ब्रुसेल्समधील सर्व भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. याशिवाय शहरातील हिंसाचार प्रकरणात ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून हिंसाचाराचं कारण आणि या प्रकरणात कुणाचा हात आहे, याचा तपास केला जात असल्याचं ब्रुसेल्स पोलिसांनी सांगितलं.

चाहत्यांकडे धारदार शस्त्र आली कुठून?

बेल्जियमचा पराभव झाल्यानंतर ब्रुसेल्समधील फुटबॉलप्रेमी हॉकी स्टीक आणि धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले. या साहित्यांच्या सहाय्यानं त्यांनी अनेक वाहनं फोडली. याशिवाय संतप्त चाहत्यांनी एका पत्रकारालाही मारहाण केली असून पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शहरात पुन्हा शांती प्रस्तापित केली आहे.

WhatsApp channel