Vinod Kambli: सचिनला सर्व माहीत आहे पण…; आर्थिक संकटात सापडलेला कांबळी कामाच्या शोधात
Vinod Kambli financial crisis: एकेकाळचा टीम इंडियाचा स्टार खेळाडू विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटाशी झुंजत आहे. ५० वर्षीय कांबळी कामाच्या शोधात असून त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनशीही संपर्क साधला आहे. त्याचा मित्र सचिन तेंडुलकर यालादेखील आपल्या परिस्थितीविषयी सर्व काही माहिती असल्याचे कांबळीने सांगितले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे तो सध्या कामाच्या शोधात असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच, त्याच्या या अशा परिस्थितीची कल्पना त्याचा मित्र आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यालाही आहे. पण कांबळीला सचिनकडून मदत नको आहे, कारण सचिनने त्याला यापूर्वीच अनेकदा मदत केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
तसेच, बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनच्या आधारेच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे कांबळीने सांगितले आहे.
५० वर्षीय विनोद कांबळीने त्याच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, “मी पहाटे ४ वाजता उठायचो, डीवाय पाटील स्टेडियमपर्यंत कॅबने जायचो. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ग्राऊंडवर कोचिंग द्यायचो, जे माझ्यासाठी खूप कष्टाचे होते”.
विनोद कांबळीने पुढे सांगितले की, “मी आता फक्त बीसीसीआयच्या ३० हजार रुपयांच्या पेन्शनवर अवलंबून आहे. मी कामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडेही गेलो होतो. मला तेथे काहीतरी काम मिळेल, अशी आशा आहे”.
सोबतच, सचिन तेंडुलकरला त्याच्या परिस्थितीबद्दल माहिती आहे का? असे विचारले असता तो म्हणाला की, “सचिनला सर्व काही माहित आहे, पण मला त्याच्याकडून काही अपेक्षा नाही. त्याने मला यापूर्वीच खूप मदत केली आहे. सचिन माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे”.
विनोद कांबळीचे करिअर-
विनोद कांबळीने भारतासाठी एकूण १०४ एकदिवसीय सामने आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५६१ धावा केल्या आहेत. ज्यात कसोटीमध्ये ४ शतके आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतकांचा समावेश आहे. विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते, तर २००० मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.