मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video: ढसाढसा रडत पव्हेलियन गाठलं, 'त्या' मैदानावर पोहोचताच सचिनला आठवला ३५ वर्षांपूर्वीचा किस्सा
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

Video: ढसाढसा रडत पव्हेलियन गाठलं, 'त्या' मैदानावर पोहोचताच सचिनला आठवला ३५ वर्षांपूर्वीचा किस्सा

18 August 2022, 11:43 ISTRohit Bibhishan Jetnavare

Sachin Tendulkar U-15 Match: सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो पुण्याच्या पीवायसी जिमखाना मैदानाशी संबंधित काही खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. सचिनने १९८६ मध्ये याच मैदानावर मुंबईसाठी पहिला अंडर-१५ सामना खेळला होता. त्या सामन्यात तो अवघ्या ४ धावा करून बाद झाला होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिन नेहमी आपल्या कारकिर्दीतले बरे वाईट अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो. असाच एक अनुभव सचिनने सांगितला आहे, जो थोडासा भावनिक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो पुण्यातील पीवायसी क्लबच्या मैदानाशी संबंधित काही खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. सचिन तब्बल ३५ वर्षांनी या ठिकाणी आला आहे.

वास्तविक सचिनने १९८६ मध्ये मुंबईसाठी पहिला अंडर-१५ सामना खेळला होता. हा सामना पुण्यातील पीवायसी जिमखाना येथे झाला होता. त्या सामन्यात तो अवघ्या ४ धावा करून बाद झाला. त्यावेळी पव्हेलियनमध्ये जाताना तो ढसाढसा रडत होता. पीवायसी जिमखाना येथे नवीन पव्हेलियन बांधण्यात आले आहे. मात्र, जुने पव्हेलियन आजही तसेच आहे. ३५ वर्षांनी या ठिकाणी पोहोचल्यानंतर सचिनला आपल्या पहिल्या सामन्यातला तो प्रसंग आठवला.

अंडर १५ च्या पहिल्या सामन्यात सचिन धावबाद

दरम्यान, व्हिडिओमध्ये सचिन सांगत आहे की, "मी पुण्याच्या पीवायसी क्लबमध्ये आहे. मी माझा पहिला अंडर-१५ सामना याच पीवायसी क्लबच्या मैदानावर खेळला. ही गोष्ट १९८६ मधली आहे. तेव्हा मी नॉन स्ट्राईक एंडवर होतो. माझ्यासोबत संघातील सहकारी राहुल गणपुलेही होता. तो माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी मोठा होता आणि तो खूप वेगाने धावायचा. त्या सामन्यात त्याने ऑफ ड्राईव्ह शॉट मारून तीन धावा घेण्यासाठी दबाव टाकला. मी धावण्यात तितकासा चांगला नव्हतो, त्यामुळे मी अवघ्या ४ धावांवर धावबाद झालो".

रडत-रडत पव्हेलियन गाठलं

तसेच, सचिन पुढे म्हणाला, 'मला अजूनही आठवते की मी रडत पॅव्हेलियनमध्ये गेलो होतो. मला पहिल्या सामन्यात अधिक धावा करायच्या होत्या, पण बाद झाल्यानंतर मी खूप निराश झालो. तेव्हा आमच्या मुंबईच्या टीमचा मॅनेजर अब्दुल इस्माईल होता. तो आणि सर्व वरिष्ठ खेळाडू मला समजावून सांगत होते की काही अडचण नाही. भविष्यातही तुला अनेक सामने मिळतील. त्यात धावा कर".

सचिन अनेक वर्षांनंतर या मैदानावर आला होता. त्यामुळे तो थोडासा भावूक झाल्याचेही दिसले.