मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Rohit Sharma: रोहित-विराटसाठी भारतीय टी२० संघाचे दरवाजे बंद?, राहुल द्रविडने दिले संकेत

Virat Kohli Rohit Sharma: रोहित-विराटसाठी भारतीय टी२० संघाचे दरवाजे बंद?, राहुल द्रविडने दिले संकेत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 06, 2023 03:31 PM IST

Rahul Dravaid on virat and rohit T20I : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर संकेत दिले की, भारतीय टी-२० संघात परतणे रोहित-विराटसाठी खूप कठीण आहे.

रोहित-विराटसाठी भारतीय टी२० संघाचे दरवाजे बंद?
रोहित-विराटसाठी भारतीय टी२० संघाचे दरवाजे बंद?

ICC T20 विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकही टी-२०आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर या दोघांचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास संपल्याचे संकेत दिले आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या टी-२०फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

पुण्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, जर आपण T२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीनंतर पाहिलं तर फक्त तीन-चार खेळाडू आहेत ज्यांनी इंग्लंडविरुद्ध सेमी फायनल सामना खेळला आणि आता श्रीलंकेविरुद्धही खेळत आहेत. पुढच्या टी-२० हंगामाबाबत आमचा विचार वेगळा आहे. श्रीलंकेसारख्या संघासोबत खेळणे हा युवा संघासाठी चांगला अनुभव आहे. महत्वाचे म्हणजे आता आमचे सर्वाधिक लक्षआयसीसी एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. त्यामुळे टी-२० मध्ये युवा खेळाडूंना आजमावण्याची चांगली संधी आहे.

द्रविडच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या,सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग हे इंग्लंडविरुद्ध टी-२०विश्वचषक उपांत्य फेरीत खेळलेल्या प्लेइंग इलेव्हनमधील केवळ चार खेळाडू आहेत जे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. याशिवाय नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडल्याच्या पांड्याच्या निर्णयाचे द्रविड समर्थन केले. तो म्हणाला, आम्ही विकेट लवकर गमावल्या. जर सुरुवात चांगली झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मैदानात भरपूर दव असल्याने त्यांच्या फिरकीपटूंना त्यांची षटके पूर्ण करता आली नाहीत. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करत होती, पण ती चांगली विकेट होती. गोलंदाजीचा निर्णय घेणे योग्य ठरले. जर आम्ही काही क्षेत्रात चांगली कामगिरी केली असती तर निकाल आमच्या बाजुने लागला असता.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या