बेळगाव येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. या स्पर्धेतील एका पैलवानाने ‘जय महाराष्ट्र’ आणि 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दिल्याने संबंधित कुस्तीपटूच्या हातातून माईक हिसकावून घेण्यात आला. तसेच, कुस्तीपटूला दमदाटी करण्यात आली.
वास्तविक, बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने हिंदवाडीमध्ये कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र व इतर भागातून पैलवान संघटना सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत एक नेपाळी पैलवानही सहभागी झाला होता. त्याने कुस्तीदरम्यान उत्सफुर्तपणाने जय महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला. पण ही घोषणा एकताच आयोजकांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी नेपाळी पैलवानाच्या हातातील माइक हिसकावून घेतला आणि 'जय महाराष्ट्र' म्हणायचे नाही, असा दम दिला. सोबतच आयोजक येथेच थांबले नाहीत. त्यांनी पैलवानाला जय कर्नाटक असे म्हणण्यास सांगितले.
या घटनेवेळी एक आयोजक म्हणाला की, असं करशील तर तुझी जेवढी उंची आहे, तेवढीच माझीही उंची याठिकाणी करून ठेवतील. माझ्यासोबत जी लोकं आहेत, त्यांची सुद्धा उंची तितकीच करून ठेवतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय चालू शकेल. पण, जय महाराष्ट्र म्हणू नको रे बाबा." असे त्या पैलवानाला सांगितले.
दरम्यान, घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध व्यक्त केला आहे. सोबतच समितीने नेपाळी कुस्तीपटूचे कौतुक केले आहे.