Pakistani Boxer Steals Money: ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इटलीत आलेल्या पाकिस्तानच्या बॉक्सरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. जुहैब रशीद नावाच्या खेळाडूने आपल्याच सहकारी खेळाडूच्या पाकिटातून पैसे चोरल्याचे वृत्त आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे. पाकिस्तानसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान हौशी बॉक्सिंग फेडरेशनने दिली.
फेडरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी इटलीतील पाकिस्तानी दूतावासाच्या निदर्शनास आणून दिले आणि या घटनेबद्दल पोलिसांत अहवालही दाखल केला. राष्ट्रीय महासंघाचे सचिव कर्नल नासिर अहमद म्हणाले की, जोहेब रशीद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाच सदस्यीय संघाचा भाग म्हणून इटलीला गेला असता त्याने सहकारी खेळाडूच्या पाकिटातील पैसे चोरले. त्याने ज्या प्रकारे वर्तन केले ते फेडरेशन आणि देशासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे.
जोहेबने गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. तो पाकिस्तानमधील उदयोन्मुख प्रतिभा मानला जात होता. नासिरने सांगितले की, एक महिला बॉक्सर लॉरा इकराम सरावासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर जोहेबने फ्रंट डेस्कवरून तिच्या रूमची चावी घेतली आणि हॉटेलमधून गायब होण्यापूर्वी तिच्या पाकिटातील पैसे चोरले.
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून ते आता त्याचा शोध घेत आहेत, मात्र तो कोणाच्याही संपर्कात नाही, असे नासिर यांनी सांगितले. पाकिस्तानचा खेळाडू राष्ट्रीय संघासह परदेशात गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. जोहेब हा भविष्यातील मोठा स्टार खेळाडू म्हणून जगाच्या समोर आला असता. परंतु, या प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीवर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.