मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs IRE: भारताचा आयर्लंडवर शानदार विजय, मालिकेत १-० अशी आघाडी
dipak hooda
dipak hooda
27 June 2022, 1:29 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 1:29 IST
  • टॉस झाल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे जवळपास २ वाया गेले. त्यामुळे शेवटी सामना १२-१२ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

ट्रेंडिंग न्यूज

भारत-आयर्लंड यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. डब्लिन येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १२ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हे आव्हान भारताने ९.२ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून दीपक हुड्डा याने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याने २९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावले. या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पांड्याचा कर्णधार म्हणून हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.

टॉस झाल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे जवळपास २ वाया गेले. त्यामुळे शेवटी सामना १२-१२ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आर्यलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारताच्या २.४ षटकातच ३० धावा फलकावर लागल्या होत्या. मात्र, इशान किशन याच षटकात बाद झाला. त्याला क्रेग यंगने क्लीन बोल्ड केले. किशनने ११ चेंडूत २६ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सुर्यकुमार यादव शुन्यावर पायचीत झाला. त्याला यंगनेच बाद केले. किशन आणि सुर्यकुमारला क्रेग यंगने लागोपाठ चेंडूवर बाद केले. त्यानंतर दुसरा सलामीवीर दीपक हुड्डा आणि कर्णधार हार्दिक पांड्याने डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांनी आयरीश गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत ३२ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २४ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि एक चौकार लगावला. पांड्याला जोशुवा लिटलने पायचीत केले. शेवटी दीपक हुड्डा ४७ धावा करुन नाबाद राहिला. तसेच, दिनेश कार्तिकही ४ चेंडूत ५ धावांवर नाबाद राहिला.

आयर्लंडचा डाव- 

प्रथम फलंदाजीस आलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकातच तंबूत परतले होते. कर्णधार अॅण्ड्रू बालबर्नीला टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात क्लीन बोल्ड केले. तर दुसरा सलामीवीर पॉल स्टर्लिंग ४ धावांवर बाद झाला, त्याला कर्णधार हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात झेलबाद केले. 

त्यानंतर हॅरी टेक्टर आणि लॉरकेन टकरला यांनी संघासाठी अर्धशतकीय भागीदारी रचली.  दोघांनी २९ चेंडूत ५० जोडल्या. मात्र, युझवेंद्र चहलने लॉरकेन टकरला १८ धावांवर बाद करत आयर्लंडला मोठा धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना हॅरी टॅक्टरने ३३ चेंडूत नाबाद ६४ धावांची दमदार खेळी केली. शेवटच्या पाच षटकात आयर्लंडने ५२ धावा चोपल्या.या बळावरच आयर्लंडला ४ विकेट्सच्या मोबदल्यात १०८ धावांपर्यंत मजल मारता आली. 

आपला पहिलाच आंतराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या उमरान मलिकला एकही विकेट मिळाली नाही. त्याला कर्णधार पांड्याने केवळ एकच षटक गोलंदाजी दिली. त्यात उमरानने १४ धावा दिल्या. भारताकडून भुवनेश्वर, चहल, पांड्या, आवेश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.