मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : सामना हरल्यानंतर हार्दिक पंड्याची वेगळीच प्रतिक्रिया; म्हणाला, धोनी हा…

IPL 2023 : सामना हरल्यानंतर हार्दिक पंड्याची वेगळीच प्रतिक्रिया; म्हणाला, धोनी हा…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 30, 2023 03:07 PM IST

Hardik Pandya praises MS Dhoni : आयपीएलच्या फायनलमध्ये सीएसके विरुद्ध पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्यानं दिलेली प्रतिक्रिया सर्वत्र व्हायरल होत आहे.

Dhoni - Pandya
Dhoni - Pandya

Hardik Pandya reaction after defeat against CSK : आयपीएलच्या फायनलमध्ये (IPL 2023) धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं सोमवारी (२९ मे २०२३) गुजरात टायटन्सचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला. सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यानं दिलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

गुजरातचा संघ पराभूत झाला खरा, मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिल्याचा आनंद हार्दिकच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याची प्रतिक्रिया देखील तशीच होती. 'एक संघ म्हणून आम्ही सर्व काही बरोबर केलं. आम्ही मनापासून खेळलो. माझ्या संघानं या स्पर्धेत जो संघर्ष केला, त्याचा अभिमान आहे. आम्ही जिंकलो तरी एकत्र जिंकतो, आम्ही हरलो तरी एकत्र हरतो हे आमचं ब्रीदवाक्य आहे. मी इथं कोणतीही सबब सांगणार नाही. चेन्नईचा संघ उत्तम खेळला. त्याचं यश हे त्यांचंच आहे, असं हार्दिक म्हणाला.

'आम्ही चांगली फलंदाजी केली, खासकरून साई सुदर्शन चांगला खेळला. अशा सामन्यात इतकं चांगलं खेळणं सोपं नाही. आम्ही प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देतो आणि त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न करतो. मोहित शर्मा, राशिद खान आणि मोहम्मद शमी हे ज्या पद्धतीनं खेळले त्याचं कौतुक आहे, असंही हार्दिक म्हणाला.

हार्दिकनं त्याच्या कारकिर्दीची सुरुवात धोनीच्या नेतृत्वाखाली केली होती. त्याच्याकडून आपण नेतृत्वाचे अनेक धडे घेतल्याचं हार्दिक म्हणाला. या सामन्यानंतरही त्यानं खास प्रतिक्रिया दिली. 'धोनीविरुद्ध हरण्याचं शल्य नाही. त्यांच्या विजयातही मला आनंद आहे. हरायचं असेल तर मी धोनी विरुद्ध हरणं पसंत करेन. चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं. तो सर्वोत्कृष्ट लोकांपैकी आहे. देव दयाळू आहे. माझ्यावरही देवाची कृपा आहेच, पण ती रात्र त्यांची होती, असं हार्दिक म्हणाला.

आयपीएलच्या फायनलच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं २० षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या. पावसामुळं सीएसकेला १५ षटकांत १७१ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारून सीएसकेला विजय मिळवून दिला.

WhatsApp channel