मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virender Sehwag : ‘नोटा बदलता येतील पण धोनीला नाही’, सेहवागकडून धोनीचं तोंडभरून कौतुक

Virender Sehwag : ‘नोटा बदलता येतील पण धोनीला नाही’, सेहवागकडून धोनीचं तोंडभरून कौतुक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 30, 2023 10:09 AM IST

Virender Sehwag On MS Dhoni : आयपीएल फायनलमधील एक व्हिडिओ शेयर करत सेहवागने महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलं आहे.

Virender Sehwag On MS Dhoni
Virender Sehwag On MS Dhoni (HT)

Virender Sehwag On MS Dhoni GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्सला धूळ चारत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळं आता सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे. याशिवाय महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच आता सीएसकेने आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने महेंद्रसिंह धोनीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सेहवागने एक व्हिडिओ शेयर करत 'नोटा बदलता येतील पण धोनीला बदलता येणार नसल्याचं' म्हटलं आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने चार सामन्यांत तीन शतकं ठोकली. त्यामुळं गुजरात आणि सीएसकेत होणाऱ्या फायनल मॅचमध्येही शुभमन विस्फोटक खेळी करणार असल्याची चर्चा होती. अपेक्षेनुसार फायनलमध्ये गुजरातचा डाव सुरू झाल्यानंतर शुभमनने चौकार-षटकारांची आतिषबाजी करायला सुरुवात केली. परंतु त्यानंतर धोनीने रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू देत डाव टाकला. जडेजाने टाकलेल्या जाळ्यात शुभमन अडकला आणि धोनीने केवळ ०.१२ सेकंदात शुभमन गिलला यष्टीचीत केलं. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने धोनीचं कौतुक करताना म्हटलं की, तुम्ही बँकेतून नोटा बदलू शकता, पण वीकेटमागील धोनीला बदलू शकत नाही. नेहमीसारखाच वेगवान महेंद्रसिंह धोनी, खुप छान. असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

गुजरात आणि चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यावेळी अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही घोळ घातला होता. गुजरातचा डाव संपल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर दोन तासांच्या उशिराने सीएसकेचा डाव सुरू झाला. ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्व्हॉय, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंच्या विस्फोटक खेळीने चेन्नईने गुजरातवर सहज विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

WhatsApp channel