मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC: ग्रुप स्टेजचे शेवटचे सामने एकाच वेळेत का? कारण यापूर्वी घडला होता ‘हा’ लाजिरवाणा प्रकार

FIFA WC: ग्रुप स्टेजचे शेवटचे सामने एकाच वेळेत का? कारण यापूर्वी घडला होता ‘हा’ लाजिरवाणा प्रकार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 29, 2022 05:52 PM IST

FIFA World Cup 2022: ग्रुप स्टेजमधील सर्व संघांचे आपापले शेवटचे सामने २९ नोव्हेंबरपासून सुरू होतील. आतापर्यंत दिवसांत ४ सामने वेगवेगळ्या वेळी खेळवण्यात आले, पण आता तसे होणार नाही. आता एका गटातील दोन सामने एकाच वेळी होणार आहेत.

FIFA WC
FIFA WC

कतार विश्वचषकात सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरू आहेत. सोमवारपर्यंत (२८ नोव्हेंबर) सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. आतापर्यंत गतविजेता फ्रान्स, पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील आणि अनुभवी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल हे पुढच्या फेरीत पोहोचले आहेत. तर, यजमान कतार बाहेर पडला आहे. मात्र अजूनही उरलेल्या २८ संघांना राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.

ग्रुप स्टेजमधील सर्व संघांचे आपापले शेवटचे सामने २९ नोव्हेंबरपासून सुरू होतील. आतापर्यंत दिवसांत ४ सामने वेगवेगळ्या वेळी खेळवण्यात आले, पण आता तसे होणार नाही. आता एका गटातील दोन सामने एकाच वेळी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दर दिवशी एका ग्रुपमधील २ दोन सामने होतील. हे सामने रात्री साडेआठपासून सुरू होतील. त्याचवेळी आणखी एका गटातील २ सामने एकाच वेळी १२:३० वाजता सुरु होतील.

आता दोन सामने वेगवेगळ्या वेळी न खेळवता एकाच वेळी का होणार, असा प्रश्न फुटबॉल चाहत्यांना पडला आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ४० वर्षे मागे जावे लागणार आहे.

फॉरमॅट का बदलला?

१९८२ चा विश्वचषक स्पेनमध्ये आयोजित करण्यात आला होता. २५ जून १९८२ रोजी पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांच्यात गट फेरीचा सामना होणार होता. हा सामना गिजोन येथील एल मोलिनॉन स्टेडियमवर खेळवला जाणार होता. हा सामना नंतर 'द ह्युमिलेशन ऑफ गिजॉन' म्हणून ओळखळा जावू लागला. या सामन्यानंतर फिक्सिंगचे आरोप करण्यात आले.

खरे तर १९८२ च्या विश्वचषकात अल्जेरियाने शानदार सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या पहिल्या गट सामन्यात पश्चिम जर्मनीचा २-१ असा पराभव केला. फुटबॉल विश्वचषकात युरोपियन संघाला पराभूत करणारा अल्जेरिया हा पहिला आफ्रिकन संघ ठरला. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० असा पराभव झाला. त्यानंतर अल्जेरियाने तिसऱ्या सामन्यात चिलीविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला. त्यावेळी एका विश्वचषकात दोन सामने जिंकणारा अल्जेरिया हा पहिला आफ्रिकन संघ ठरला.

यानंतर पुढच्या दिवशी पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांच्यात सामना होणार होता. या दोन्ही संघांचे पुढे जाणारे समीकरण स्पष्ट होते. जर पश्चिम जर्मनीने ऑस्ट्रियाला एक किंवा दोन गोलच्या फरकाने पराभूत केले तर दोन्ही संघ पुढच्या फेरीत जाणार होते. त्यासोबतच अल्जेरिया स्पर्धेतून बाहेर पडणार होता. दुसरीकडे, जर पश्चिम जर्मनीने ४-० किंवा त्याहून अधिक फरकाने विजय मिळवला, तर अल्जेरियाचा संघ जर्मनीसोबत बाद फेरीत जाणार प्रवेश करणार होता. म्हणजेच जर्मनीने ऑस्ट्रियाला ३ पेक्षा अधिक गोलने हरवावे, अशी अल्जेरियाच्या चाहत्यांची इच्छा होती.

जर्मनी-ऑस्ट्रियावर फिक्सिंगचे आरोप

पुढच्या फेरीत जायचे समीकरण असे होते. सामन्याच्या दिवशी पश्चिम जर्मनीने ऑस्ट्रियाविरुद्ध पहिल्या १० मिनिटांत एक गोल केला. अल्जेरियन चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या, पण पुढे जे काय झाले ते अतिशय वाईट होते. या एकमेव गोलनंतर पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रियाने गोल करण्याचा प्रयत्नच केला नाही. पश्चिम जर्मनीने हा सामना १-० ने जिंकला आणि जर्मनीसह ऑस्ट्रिया पुढच्या फेरीत गेले.

पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांच्यावर फिक्सिंगचा आणि निकाल प्रभावित करण्याचा आरोप लावण्यात आला. पण फिफाने असे काही झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, या या सामन्यानंतर फिफाने फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला. तेव्हापासून ग्रुप स्टेजचे सर्व संघांचे शेवटचे सामने एकाच वेळी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोणत्याही संघाला चुकीचा फायदा घेण्याची संधी मिळणार नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या