फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. गुरुवारी दोहा येथे सर्बियासोबत झालेल्या सामन्यात ब्राझीलने २-० ने विजय मिळवला. या विजयासह ब्राझीलने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लीसनने अफलातून गोल केला. फिफाने या गोलचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
व्हिनिशियस ज्युनियरचा गोलचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ७३व्या मिनिटाला रिचार्लीसनने गोल केला. व्हिनिसियसने सर्बियन खेळाडूंपासून चेंडू आपल्या ताब्यात घेत रिचार्लीसनकडे पास केला. या पासवर रिचार्लीसनने अप्रतिम अॅक्रोबॅटिक सिझर किकने गोल केला. तत्पूर्वी, रिचार्लीसनने ६२व्या मिनिटाला संघासाठी गोल केला होता.
वर्ल्डकप खेळेन की नाही शंका होती- रिचर्डसन
२५ वर्षीय रिचार्लीसनला ऑक्टोबरमध्ये प्रीमियर लीगच्या सामन्यात दुखापत झाली होती. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी तो ब्राझीलच्या संघात सहभागी होऊ शकणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण त्याने संघात पुनरागमन केले. सामना संपल्यानंतर रिचार्लीसन म्हणाला की, '४ आठवड्यांपूर्वी मी विश्वचषकासाठी संघात असेल की नाही या शंकेने रडत होतो. मी फिटनेस टेस्टसाठी गेलो तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. कारण मी तिथे स्ट्रेचरवर होतो, डॉक्टरांच्या निकालाची वाट पाहत होतो."
२०१० पासून ब्राझीलचा युरोपियन संघांविरुद्धचा विश्वचषकातील रेकॉर्ड चांगला राहिला आहे. ९ सामन्यातील ३ जिंकले आहेत, दोन अनिर्णित राहिले आहेत, चार पराभूत झाले आहेत. ब्राझीलचा पुढील सामना स्वित्झर्लंडशी होणार आहे. स्वित्झर्लंडने ग्रुप-G च्या दुसऱ्या सामन्यात कॅमेरूनचा १-० असा पराभव केला.
संबंधित बातम्या