मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENGvsNZ: ९२ वर्षांनंतर ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला, डॅरिल मिचेलचा भीम पराक्रम

ENGvsNZ: ९२ वर्षांनंतर ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला, डॅरिल मिचेलचा भीम पराक्रम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 28, 2022 04:20 PM IST

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील सलग तीन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा डॅरिल मिचेल हा दुसराच परदेशी फलंदाज ठरला आहे. मिचेल आधी ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये अशी कामगिरी केली होती.

daryll mitchell
daryll mitchell

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडसाठी काहीही चांगले घडले नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या किवी संघाला या मालिकेदरम्यान बराच संघर्ष करावा लागला. मालिकेतील प्रत्येक सामन्यात न्युझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्युझीलंडने ही मालिका ३-० ने गमावली आहे.

दरम्यान, न्युझीलंडसाठी ही मालिका अतिशय निराशाजनक राहिली. मात्र, त्यांचा फलंदाज डॅरेल मिचेलसाठी इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक सामन्यात मिचेलने शतक झळकावले आहे.

या मालिकेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ फ्लॉप ठरला, पण डॅरिल मिचेलने शानदार फलंदाजी केली. या मालिकेत मिचेलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने तीन सामन्यांच्या ६ डावात १०७.६० च्या सरासरीने ५३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६० चौकार आणि ८ षटकार मारले. यावरुन मिचेलच्या उत्कृष्ट फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. या मालिकेतील दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज जो रूट हा देखिल धावांच्या बाबतीत मिचेलपेक्षा १४२ धावांनी मागे आहे.

मिचेलने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण ४ शतके झळकावली असून यातील तीन शतके याच मालिकेतून आली आहेत. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली आहे.

९२ वर्षात प्रथमच अशी कामगिरी-

मालिकेतील पहिल्या लॉर्ड्स कसोटीत मिचेलने १०८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ट्रेंट ब्रिज येथे १९० आणि हेडिंग्ले येथे १०९ धावा केल्या. तिन्ही कसोटी सामन्यात शतकी खेळी करण्यासोबतच त्याने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

तो म्हणजे, इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील सलग तीन सामन्यांमध्ये शतक झळकावणारा डॅरिल मिचेल हा दुसराच परदेशी फलंदाज ठरला आहे. मिचेल आधी ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये अशी कामगिरी केली होती. इंग्लंडमध्ये सलग तीन कसोटीत शतक झळकावणारा मिचेल हा न्यूझीलंडचा पहिलाच खेळाडू आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी नुझीलंडने मायदेशात इंग्लंडचा २-० अशा फरकाने पराभव केला होता. मात्र, इंग्लंडमध्ये न्यूझीलंडच्या संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. दोन सराव सामन्यांमध्येही त्यांना एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतरच्या तीनही सामन्यांत न्यूझीलंडचा पराभव झाला.

WhatsApp channel