Pakistan vs England T20 World Cup Final: टी-20 विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
मात्र, त्यापूर्वी १३७ धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने शानदार सुरुवात केली होती. त्याने अॅलेक्स हेल्सला पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर हरिस रौफने फिल सॉल्ट आणि जोस बटलरची विकेट घेतली. इंग्लंडचे हे तिन्ही मोठे फलंदाज पॉवरप्लेमध्येच तंबूत परतले होते. इंग्लंडचा संघ दबावात आला होता. सर्व काही पाकिस्तानच्या बाजूने सुरु होते.
शाहीनला दुखापत
पण त्यानंतर एक दुर्देवी गोष्ट घडली. शाहीन आफ्रिदीला १४व्या षटकात हॅरी ब्रुक्सचा झेल घेताना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच पाकिस्तानने वर्ल्डकप गमावला. शादाब खानच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुक्सने एक उंच फटका मारला. मात्र शाहीनने डाईव्ह मारत ब्रुक्सचा झेल घेतला. हा झेल घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. शाहीन आधीच गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त होता. हा झेल घेताना त्याची दुखापत वर आली. त्यानंतर तो काहीवेळासाठी मैदानाबाहेर गेला.
त्यानंतर १६वे षटक टाकण्यासाठी शाहीन पुन्हा मैदाना आला. त्याने १६व्या षटकातील पहिला चेंडू टाकला. मात्र, त्याला प्रचंड वेदना होत होत्या. एक चेंडू टाकल्यानंतर तो पुन्हा मैदानाबाहेर गेला आणि इथेच सामना पाकिस्तानच्या हातून निसटला.
स्टोक्सने इफ्तिकारच्या ५ चेंडूत १३ धावा काढल्या
१६व्या षटकाचे उरलेले ५ चेंडू टाकण्यासाठी कर्णधार बाबर आझमने पार्ट टाईम गोलंदाज इफ्तिकार अहमदला बोलावले. पार्ट टाईम गोलंदाज पाहून बेन स्टोक्सने ५ चेंडूत १३ चोपल्या. या १३ धावांमुळेच इंग्लंडचा संघ दबावातून बाहेर आला. हाच पाकिस्तानच्या पराभवाचा आणि इंग्लंडच्या विजयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला त्याच्या कोट्यातील ११ चेंडू टाकता आले नाहीत. त्याने २.१ षटके टाकली. शाहीनने त्याचे उरलेले ११ चेंडू टाकले असते तर त्याचा नक्कीच मोठा परिणाम झाला असता.
संबंधित बातम्या