bhagyashree madhavrao jadhav silver medal in womens shot put : चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने इतिहास रचला आहे. भाग्यश्रीने आज गोळाफेकीत (शॉट पुट-F34) रौप्य पदकाची कमाई केली. तिने ७.५४ मीटरच्या प्रभावी थ्रोसह रौप्य पदक जिंकले आहे.
दरम्यान, एशियन पॅरा गेम्समध्ये भारताची शानदरा कामगिरी सुरूच आहे. भारतीय पॅरा खेळाडूंनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) इतिहास रचला, आशियाई पॅरा गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताने एशियन पॅरा गेम्समध्ये आतापर्यंत ८० पदके जिंकली आहेत. यात १८ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
भारताने २०१८ च्या इंडोनेशियामधील जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये ७२ पदके जिंकली होती. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने आतापर्यंत १८ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३९ कांस्य पदके, अशी एकूण ८० पदके जिंकली आहेत.
एशियन पॅरा गेम्समध्ये आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. भारत हांगझोऊ गेम्स एशियन पॅरा गेम्समध्ये १०० पदके कमावण्याच्या मार्गावर आहे.
भाग्यश्री जाधव ही नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी आहे. भाग्यश्रीने टोकियो पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला होता. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री माधव जाधव हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची कमाई केली. त्यानंतर २०१९ मध्ये तिची चीन येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. यात तिने दोन कास्य पदके मिळवून इतिहास रचला होता.