हिंदू नववर्ष ९ एप्रिल २०२४ पासून सुरू झाले आहे. हिंदू नववर्षानुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होते. हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे व्रत-उपवास आहेत, त्यापैकी एक म्हणजे एकादशी, चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षातील म्हणजेच नववर्षातील पहिली एकादशी कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.
कामदा एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती होते. कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. नववर्षातली पहिली कामदा एकादशी तिथी कधी आहे? जाणून घ्या कामदा एकादशी २०२४ ची तारीख, पूजा वेळ आणि महत्त्व.
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी १९ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी श्री हरीची उपासना व उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व वैकुंठधामची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार १८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी समाप्त होईल. एकादशीच्या पूजेची वेळ - सकाळी ५ वाजून ५१ मिनिटे ते १० वाजून ४३ मिनिटे आहे.
कामदा एकादशीच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. त्या दिवशी रवि योग सकाळी ५ वाजून ५१ मिनिटे ते १० वाजून ५७ मिनिटापर्यंत आहे. तर वृद्धी योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सकाळी १.४५ पर्यंत राहील, त्यानंतर ध्रुव योग असेल. कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी १०:५७ पर्यंत राहील, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील.
कामदा एकादशीचे व्रत केल्यास साधकांना १०० यज्ञासमान फळ मिळते. हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, म्हणून या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. हजारो वर्षांच्या तपस्या, सोने-मोती दान, सौभाग्याच्या वस्तूंचे दान इत्यादींपेक्षा केवळ कामदा एकादशीचे व्रत अधिक फलदायी असल्याचे वेद आणि पुराण सांगते. कामदा एकादशीला फलदा एकादशी असेही म्हणतात.