Gang Rape Case: एम्समधून घरी परतणाऱ्या तरुणीवर लॉजमध्ये सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून चौघांना बेड्या
Gang Rape Case : एम्समधून घरी जात असलेल्या तरुणीचं अपहरण करून तिच्यावर चार जणांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
Bihar Gang Rape Case : राजधानी दिल्लीत एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारच्या दानापुरमध्ये एका तरुणीवर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एम्स रुग्णालयातून घरी जात असलेल्या तरुणीचं अपहरण करत आरोपींनी तिच्यावर एका हॉटेलमध्ये आळीपाळीनं बलात्कार केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनेच्या काही तासांच्या आत चारही आरोपींना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळं बिहारमधील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दानापुरच्या एम्स रुग्णालयातून घराच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी लिप्ट देण्याच्या बहाण्यानं चार आरोपींनी तिचं अपहरण करत तिला शहरातील एका हॉटेलमध्ये नेलं. त्यानंतर चार आरोपींनी तरुणीवर आळीपाळीनं बलात्कार केला. तसेच या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. बलात्कार केल्यानंतर आरोपी तरुणीला शहरातील मुख्य चौकात सोडून पसार झाले. त्यानंतर पीडितेनं घरी न जाता थेट पोलीस ठाणे गाठत घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत घटनेच्या काही तासांतच त्यांना अटक केली आहे. याशिवाय पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची मेडिकल टेस्ट केल्यानंतर आरोपींविरोधात पुढील कारवाई केली जाणार आहे.
ज्या आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे, त्यांना अठक करण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. तसेच हा धक्कादायक प्रकार ज्या हॉटेलमध्ये घडला त्याला सील करण्यात आलं असून लॉजच्या मालकालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एएसपी मनीष कुमार सिन्हा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दानापुरमध्ये नेहमीच वर्दळ असलेल्या परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर आता प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.