मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  META च्या नोकरकपातीची कुऱ्हाड.. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गेली नोकरी; लिहिली भावनिक पोस्ट

META च्या नोकरकपातीची कुऱ्हाड.. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गेली नोकरी; लिहिली भावनिक पोस्ट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 10, 2022 07:45 PM IST

Facebook ची मूळ कंपनी असलेल्या मेटाने जवळपास ११ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये एका भारतीय तरुणाचीही नोकरी गेली असून नोकरीत रुजू झाल्यानंतर दोनच दिवसात त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

मेटा
मेटा

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांमधील नोकरकपातीमुळे अनेक भारतीयांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील कंपनी मेटाने एका झटक्यात ११,००० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. META मध्ये कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये हिमांशू व्ही हा भारतीय तरुणही आहे. हिमांशूवर दु:खाचा डोंगर कोसळलाअसून विशेष म्हणजे कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

कामावरून काढून टाकल्यानंतर हिमांशूने लिंक्डइनवर आपले दु:ख शेअर केले आहे आणि त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे तो हैराण आणि अस्वस्थ का आहे,  हे सांगितले आहे. हिमांशूने सांगितले की तो META मध्ये सामील होण्यासाठी कॅनडाला गेला आणि ऑफिसमध्ये रुजू झाला, पण दोनच दिवसांनंतर META मधील त्याचा प्रवास संपुष्टात आला. कारण त्याला नोकरीवरून काढल्याचे पत्र देण्यात आले.

हिमांशूने लिहिलेली पोस्ट
हिमांशूने लिहिलेली पोस्ट

हिमांशूने पुढे लिहिले की, 'मी त्या सर्वांसोबत आहे जे सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. आता माझे काय? खरे सांगायचे तर,माझ्याकडे कोणतीही कल्पना नाही. आता पुढे काय होते याची मी वाट पाहत आहे. जर तुम्हाला कॅनडा किंवा भारतातील सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी नोकरी किंवा पोस्ट मिळाल्यास, कृपया मला कळवा. हिमांशूची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मेटा आणि ट्विटरच्या नोकरकपातीला केवळ हिमांशूच नाही तर हजारो तरुण बळी पडले आहेत.

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने १३ टक्के म्हणजे जवळपास ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उत्पन्नात झालेली घसरण आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग