मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah: पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला : अमित शहा

Amit Shah: पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी पाठीत खंजीर खुपसला : अमित शहा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 23, 2022 02:51 PM IST

Amit Shah: अँटी काँग्रेसच्या राजकारणातून जन्म झालेले आता पंतप्रधान होण्यासाठी काँग्रेससोबत जात असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (फोटो - पीटीआय)

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी पूर्णियातील सभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत लालु प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत राज्यात हातमिळवणी करून पुन्हा सत्ता स्थापन केली. तसंच नितीश कुमार यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी होत असलेल्या चर्चेवरून अमित शहा यांनी टीका केली. कुटील राजकारण करून नितीश कुमार पंतप्रधान बनू शकत नाहीत असं अमित शहा म्हणाले.

आधी भाजपला धोका दिला. नंतर जीतन राम मांझी यांना धोका दिला. रामविलास पासवान यांना धोका दिला. लालू प्रसाद यादव यांना धोका दिला. पुन्हा भाजपला धोका देऊन लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेले. म्हणूनच या सभेतून नितीश कुमार आणि लालू यादव यांना सांगेन की हे जे पक्षांतर तुम्ही करताय ते बिहारच्या जनतेला दिलेला धोका आहे.

सात वर्षांनी मी बिहारला आलोय. नितीश कुमार माझे भाषण नक्की ऐकत असतील. मी इथं दिलेल्या आश्वसानांचा हिशोब घेऊन आलोय. नितीश कुमारजी तुम्ही पेन घेऊन बसा असा टोलाही अमित शहा यांनी नितीश कुमार यांना लगावला.

अँटी काँग्रेस राजकारणातून जन्म घेतलेल्या नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्यासाठी काँग्रेससोबत जाणं स्वीकारलं आहे. नितीश कुमार यांनी अनेकांना धोका दिला आहे. लालू प्रसाद यांना धोका देऊन भाजपसोबत आले पण पंतप्रधान होण्यासाठी त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

नितीश कुमार आणि लालु प्रसाद यादव यांच्या जोडीला इशारा देताना अमित शहा यांनी म्हटलं की, "२०२४ मध्ये लालू-नितीश यांच्या जोडीचा सुपडा साफ करू. हीच परिस्थिती २०२५ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही होईल जेव्हा भाजप बिहारमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल."

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या