मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wrestlers Protest : ‘तुमच्यामुळे इतरांना त्रास होईल, असं वागू नका’, मोदी सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना फटकारलं

Wrestlers Protest : ‘तुमच्यामुळे इतरांना त्रास होईल, असं वागू नका’, मोदी सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना फटकारलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 31, 2023 07:13 PM IST

Anurag Thakur On Wrestlers Protest : भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहे.

 Wrestlers Protest
Wrestlers Protest (Amit Sharma)

Anurag Thakur On Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. परंतु आता दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटवलं आहे. त्यानंतर कुस्तीपटूंनी देशासाठी जिंकलेली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुस्तीपटूंनी हा निर्णय मागे घेत मोदी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंना चांगलंच फटकारलं आहे.

माध्यमांशी बोलताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्ही आंदोलक कुस्तीगिरांचं सगळ्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळं आंदोलक कुस्तीपटूंनी न्यायालय, पोलीस किंवा आम्ही नेमलेल्या समितीवर विश्वास ठेवावा लागेल. खेळाडूंनी चौकशी होईपर्यंत वाट बघावी आणि त्यानंतर योग्य वाटलं तर आंदोलन करावं. परंतु तुमच्यामुळं अन्य खेळाडूंना त्रास होईल, असं त्यांनी वागू नये, असं म्हणत त्यांनी आंदोलक कुस्तीपटूंना फटकारलं आहे. त्यामुळं आता आदोलक कुस्तीपटू आणि मोदी सरकारमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी सरकारची भूमिका आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. परंतु आंदोलक कुस्तीपटूंनी अशी कोणतीही कृती करायला नको की ज्यामुळं इतर कुस्तीपटूंना त्याचा त्रास होईल, असंही क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.

IPL_Entry_Point