मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Brijbhushan Singh : गुन्हा दाखल होऊनही बृजभूषण यांना अटक का नाही?, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

Brijbhushan Singh : गुन्हा दाखल होऊनही बृजभूषण यांना अटक का नाही?, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 31, 2023 03:33 PM IST

Delhi Police On Brijbhushan Singh : भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

WFI chief and BJP MP Brij Bhushan Singh
WFI chief and BJP MP Brij Bhushan Singh (ANI)

Delhi Police On Brijbhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलक कुस्तीपटूंना आंदोलनस्थळावरून हटवलं आहे. त्यामुळं संतापलेल्या कुस्तीपटूंनी देशासाठी जिंकलेली पदकं गंगेत वाहून देण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून वाद सुरू असतानाच आता बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक का होत नाहीय?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत नेमकी माहिती दिली आहे.

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात बलात्काराचे कोणतेही ठोस पुरावे न सापडल्यामुळं त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात पुढील १५ दिवसांत पोलिसांकडून फायनल रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे न मिळाल्याने बृजभूषण यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. बृजभूषण हे साक्षीदारांवर कोणताही दबाव टाकत नसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करत नसल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

आंदोलक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावरील कारवाईसाठी पदकं गंगेत वाहून देण्याची घोषणा केली होती. परंतु भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी कुस्तीपटूंना विनंती केल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. दुसरीकडे पदकं गंगेत वाहण्यापेक्षा माझ्यावर जे आरोप केलेत ते सिद्ध करा, असं आव्हान खासदार बृजभूषण सिंह यांनी आंदोलक कुस्तीपटूंना दिलं आहे. त्यामुळं आता बृजभूषण सिंह आणि कुस्तीपटूंमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point