मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; २०२० मध्ये आफताबविरुद्ध पोलिसांत दाखल झाली होती तक्रार

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; २०२० मध्ये आफताबविरुद्ध पोलिसांत दाखल झाली होती तक्रार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 23, 2022 12:35 PM IST

Shraddha Murder Case : आरोपी आफताबविरोधात श्रद्धा वालकरनं २०२० साली पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

Shraddha Murder Case In Delhi
Shraddha Murder Case In Delhi (HT)

Shraddha Murder Case In Delhi : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांसह पाच राज्यांच्या पोलिसांनी कसून तपास सुरू केल्यानंतर आता दिवसेंदिवस नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. काल आरोपी आफताब पुनावाला याला पोलिसांनी दिल्लीतील साकेत कोर्टात हजर केलं होतं, त्यावेळी त्यानं रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर जेव्हा श्रद्धा आणि आफताब हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते, त्यावेळी त्यांनी गांजाची खरेदी केल्याचीही माहिती समोर आलेली असतानाच आता आफताबच्या छळाला कंटाळून श्रद्धानं २०२० मध्ये मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

झी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा वालकरनं २०२० मध्ये आफताबच्या त्रासाला कंटाळून मुंबईतील वसई पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रारीत श्रद्धानं आफताबकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय गेल्या सहा महिन्यांपासून आफताब मला मारत आहे, त्यामुळं तो रागाच्या भरात तुकडे-तुकडे करून मारू शकतो, त्यामुळं मी तणावाखाली असल्याचं श्रद्धानं पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं.

मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहण्याचा आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता मला त्याच्यासोबत रहायचं नाहीये. कारण मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचं श्रद्धानं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. परंतु त्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई का केली नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज दिल्ली पोलीस श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबचा पॉलीग्राफ टेस्ट करणार आहे. या टेस्टच्या माध्यमातून आफताबनं श्रद्धाची हत्या का आणि कशी केली, याचा छडा लावला जाणार आहे. त्यामुळं आता या प्रकरणात आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point