rahul gandhi popularity : देशातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही पहिल्या क्रमांकावर असले तरी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार राहुल गांधी हे लोकप्रियतेच्या बाबतीत मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं पुढील निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असाच सामना होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एनडीटीव्हीनं सीएसडीएसच्या मदतीनं हे सर्वेक्षण केलं आहे. देशातील १९ राज्यांत १० ते १९ मे च्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात राहुल गांधी व काँग्रेसला पाठिंबा वाढत असल्याचं समोर आलं आहे.
कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतरही मोदी सरकारला पुन्हा एकदा संधी देण्याची लोकांची मानसिकता दिसत आहे. सुमारे ४३ टक्के लोकांनी मोदी सरकारला तिसऱ्यांदा संधी देण्याबाबत अनुकूल मत व्यक्त केलंय. ३८ टक्के लोकांनी याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान म्हणून बहुतेक लोकांनी नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे. भाजपसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
देशात काँग्रेसची स्थिती सुधारताना दिसत आहे. तब्बल २९ टक्के लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १९ टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत ही आकडेवारी खूपच दिलासादायक आहे. काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीला गेल्या निवडणुकीत त्यांना २६.१ टक्के मतं मिळाली होती. भाजपनं यूपीएचा पराभव केला होता.
पंतप्रधान म्हणून आजही लोक मोदींना पसंती देत असले तरी काँग्रेससाठीही आनंदाची बातमी आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली आहे. आज निवडणुका झाल्या तर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान बनतील, असं मत २७ टक्के लोकांनी व्यक्त केलंय. २०१९ मध्ये हा आकडा २४ टक्के होता. गेल्या चार वर्षांत त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारत जोडो यात्रा हे राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधी हे नेहमीच आमचे आवडते नेते राहिले असल्याचं मत सुमारे २६ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर, १५ टक्के लोकांनी भारत जोडो यात्रेनंतर ते आपल्याला आवडू लागल्याचं म्हटलं आहे. तर, राहुल गांधी आवडत नसल्याचं मत १६ टक्के लोकांनी व्यक्त केलंय. २७ टक्के लोकांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.