मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशाच्या इतिहासात एकदाच राष्ट्रपती निवडणूक झालीय बिनविरोध

देशाच्या इतिहासात एकदाच राष्ट्रपती निवडणूक झालीय बिनविरोध

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 21, 2022 08:15 AM IST

देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. यानंतर देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.

माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी
माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Presidential Election: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी मतदान पार पडले. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात केवळ एकाच राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली होती. १९७७ मध्ये देशाचे ७ वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची निवड झाली होती. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधात तब्बल ३७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

भारताचे सहावे राष्ट्रपती फकरुद्दीन यांचे ११ फेब्रुवारी १९७७ रोजी निधन झाले. तेव्हा उपराष्ट्रपती बीडी जत्ती यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली.

१९६९ मध्येही नीलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. मात्र इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे ते निवडून येऊ शकले नव्हते. इंदिरा गांधी यांनी त्यावेळी काँग्रेस नेत्यांना आपला आतला आवाज ऐकून मत देण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या खासदार, आमदारांनी व्ही व्ही गिरी यांना मत दिलं होतं. खरंतर एकही उमेदवार आवश्यक मते पहिल्या फेरीत मिळवू शकला नव्हता. मात्र सर्वाधिक मते मिळाल्याने गिरी यांचे पारडे जड ठरले.

एकदा पराभूत झाल्यानंतर नीलम संजीव रेड्डी यांनी राजकीय संन्यासही घेतला. दरम्यान, १९७७ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना जनता पार्टीने अधिकृत उमेदवार जाहीर केलं. यावेळी काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांनी १९६९ ची चूक सुधारत नीलम संजीव रेड्डी यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नाही.

नीलम संजीव रेड्डी यांच्याविरोधात तब्बल ३६ अपक्ष उमेदवारांनी अर्ज केला होता. देशातील इतर पक्षांचा मात्र नीलम संजीव रेड्डी यांना पाठिंबा होता. मात्र सर्व ३६ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले होते. बाकीचे सर्व अर्ज अवैध ठरल्यानं निवडणुकीत फक्त एकमेव नीलम संजीव रेड्डी हेच एकटे उरले आणि देशाचे ७ वे राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली.

IPL_Entry_Point