मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mitesh Bhatt : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीकडून महिलेचा विनयभंग; गुजरातमध्ये संतापाची लाट

Mitesh Bhatt : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीकडून महिलेचा विनयभंग; गुजरातमध्ये संतापाची लाट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 01:05 PM IST

Bilkis Bano Rape Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला २०२० मध्ये पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. परंतु त्यानं तुरुंगाबाहेर असताना एका महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Bilkis Bano Rape Case
Bilkis Bano Rape Case (HT)

Bilkis Bano Rape Case : केंद्रीय गृहमंत्रालयानं परवानगी दिल्यानंतर गुजरात सरकारनं बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं देशात राजकीय वादंग पेटलं होतं. या प्रकरणातील ११ आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर सोडण्यात आल्याचं स्पष्टीकरण गुजरात सरकारकडून देण्यात आलं होतं. परंतु आता याच प्रकरणात पॅरोलवर असलेल्या एका आरोपीनं महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मितेश चिमणलाल भट्ट असं आरोपीचं नाव असून गुजरात पोलिसांच्या त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता या घटनेवरून गुजरात सरकारच्या भूमिकेवर आणि बलात्काराच्या आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर टीका केली जात आहे.

बलात्काराच्या ११ आरोपींना गुजरात सरकारनं सोडल्याच्या निर्णयाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुहासिनी अली, पत्रकार रेवती लाल आणि प्राध्यापक रूप रेखा वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवेळी गुजरात सरकारनं जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय, त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञापत्रात १९ जून २०२० रोजी बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी मितेश भट्टला पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं तुरुंगाबाहेर गेल्यानंतर एका महिलेचा विनयभंग केल्यामुळं त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुजरात सरकारनं कोर्टाला दिली आहे.

२००२ साली गोध्रातील जळीतकांडानंतर गुजरातमध्ये धार्मिक दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी जमावानं बिल्किस बानोच्या कुटुंबातील १४ लोकांची हत्या करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी बिल्किस बानो ही पाच महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणातील ११ आरोपींना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु तुरुंगात आरोपींचं वर्तन चांगलं असल्याचं कारण देत गुजरात सरकारनं बलात्कारातील ११ आरोपींची सुटका केली होती. त्यामुळं विरोधकांनी गुजरात सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती.

IPL_Entry_Point