मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Heeraben Modi Demise : राहुल गांधी, नितीश कुमार यांच्यासह दिग्गजांनी केलं पंतप्रधान मोदींचं सांत्वन

Heeraben Modi Demise : राहुल गांधी, नितीश कुमार यांच्यासह दिग्गजांनी केलं पंतप्रधान मोदींचं सांत्वन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 24, 2023 11:55 AM IST

Leaders Condoled the Demise of Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांच्या निधनानंतर देशभरातील मान्यवरांनी पंतप्रधान मोदींचं सांत्वन केलं आहे.

Narendra Modi
Narendra Modi (PTI)

Leaders Condoled the Demise of Heeraben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं आज निधन झालं. पंतप्रधानांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा मोलाचा वाटा होता. आई हा त्यांच्यासाठी ऊर्जेचा अखंड स्त्रोत होता. त्यांच्या निधनामुळं पंतप्रधान मोदींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिग्गज नेत्यांनी हिराबेन यांना श्रद्धांजली वाहतानाच पंतप्रधान मोदी यांचंही सांत्वन केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, विरोधी पक्षनेते अजित पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी हिराबेन यांच्या निधनाबद्दल अतीव दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धीर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झालं. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तुमच्या आईच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीचं जाणं हे फारच दु:खदायक आहे. मी आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'हिराबा यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना नितीश यांनी केली आहे.

प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग