Himachal Pradesh Nivadnuk Nikal 2022: गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. सध्याचे कल पाहता काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १० जागांवर पुढं आहे. दोन्ही पक्षांमध्ये कमी अंतर राहिल्यास तिथं फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता आहे. भाजपची आतापर्यंतची रणनीती पाहता काँग्रेसचे दिग्गज आधीच सावध झाले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी 'डॅमेज कंट्रोल'ची जबाबदारी हाती घेतली आहे.
देशातील अनेक राज्यांत भाजपनं केंद्रीय सत्तेच्या बळावर आमदार फोडल्याचे दाखले आहेत. केंद्रात सत्ता असल्यानं भाजपला हे सहज शक्य आहे. त्यातच हिमाचलमध्ये एक-दोन आमदार इकडं-तिकडं गेले तरी सत्तापालट होऊ शकतो. असं काही घडू नये म्हणून निकालानंतर लगेचच काँग्रेस आमदारांना चंदीगड किंवा काँग्रेसशासित राज्यांतील हॉटेलांत हलवले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रतिभा सिंह आणि सुखविंदर सिंग सुखू यांच्यात चुरस आहे. याचा फायदा घेत भाजप काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून फोडू शकतो. त्यामुळंच काँग्रेस निकालाच्या आधीच डावपेच आखण्यात गुंतली आहे.
प्रतिभा सिंह यांनी याआधीच मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यानं काँग्रेसची कोंडी झाली आहे. प्रतिभा सिंह या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा असून सहा वेळा हिमाचलचं मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. वीरभद्र यांना राज्यात मोठा जनाधार आहे. त्या बळावर प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. सत्ता स्थापण्याइतके आमदार निवडून आल्यास हा पेचही काँग्रेसला सोडवावा लागणार आहे.
हिमाचल विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपनं ६८ पैकी ४४ जागा जिंकल्या होत्या. यावेळीही भाजपनं विजयाचा दावा करत सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडली जाईल, असं म्हटलं आहे. तर, सत्ता बदलाची परंपरा कायम राहील, असा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या