मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केजरीवालांनी विजयाचा लेखी दावा केलेल्या उमेदवारांचे काय झालं अन् विजयी झालेले ५ उमेदवार कोण?

केजरीवालांनी विजयाचा लेखी दावा केलेल्या उमेदवारांचे काय झालं अन् विजयी झालेले ५ उमेदवार कोण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 08, 2022 08:26 PM IST

गुजरात निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी तीन उमेदवारांच्या विजयाचा लेखी दावा केला होता. त्या उमेदवारांचे काय झाले तसेच भाजपच्या वादळात आपच्या कोणत्या पाच उमेदवारांनी विजय मिळवला हे जाणून घेऊया…

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व गुजरातमध्ये भाजपची लाट असल्याचे स्पष्ट झाले. भाजपने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत दीडशेचा आकडा पार केला तर काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वात दारुण पराभव झाला. गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने सर्व १८२ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी पाच जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत तर १३ टक्के मतेही मिळवली आहे. 

काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कागदावर लिहून आपल्या तीन उमेदवारांच्या विजयाचा लेखी दावा केला होता. त्यामध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांची नावे होती. यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्यांनी असाच दावा केला होता. त्यावेळी त्यांचा दावा बरोबर ठरला अन् पंजाबमध्ये आपची सत्ता आली. गुजरातमध्ये त्यांचा दाव्याचं काय झालं? तर चला जाणून घेऊया.

 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत इसुदान गढवी, प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि अल्पेश कथिरिया यांच्या विजयाचा दावा केला होता. मात्र या तिन्ही नेत्यांचा पराभव झाला आहे. 

खंभालिया मतदारसंघ : इसुदान गढवी पराभूत -

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा इसुदान गढवी हे देवभूमी द्वारकाच्या खंभालिया मतदारसंघातून पराभत झाले आहेत. त्यांना भाजपचे उमेदवार मुलुभाई बेरा यांनी पराभूत केले. 

कटरगाम मतदारसंघ: गोपाल इटालिया पराभूत

गुजरातमधील कटारगाम विधानसभा जागेसाठी आम आदमी पक्षाचे प्रदेश गोपाल इटालिया हे निवडणूक रिंगणात होते, त्यांच्या विजयाचा दावा अरविंद केजरीवाल यांनीही केला होता. या जागेवर भाजपचे विनू मोराडिया विजयी झाले आहेत. 

वरछा : अल्पेश कथिरिया पराभूत

पटेल आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा अल्पेश कथिरिया यांनी पाटीदारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वराछा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. अल्पेश कथिरिया निवडणूक जिंकतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता, मात्र निकाल उलटला आहे. भाजपचे उमेदवार किशोर कनानी यांनी कथिरिया यांचा पराभव केला आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांचा दावा फोल ठरला आहे.

भाजपचे पाच विजयी उमेदवार –

चैतरभाई दामजीभाई वसावा -
डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातून आप उमेदवार चैतरभाई दामजीभाई वसावा यांनी काँग्रेसचे जर्माबेन शुक्लाल वसावा यांचा पराभव केला. 

मकवाना उमेशभाई नारनभाई
बोटाद विधानसभा सीटमधून आप उमेदवार मकवाना उमेशभाई नारनभाई यांनी भाजपचे घनश्यामभाई प्रागजीभाई विरानी यांना पराभूत केले. 

सुधीरभाई वाघाणी - 
गरियाधर विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार सुधीरभाइ वाघाणी (सुधीर वाघाणी) यांनी भाजपचे नाकराणी केशुभाई हीरजीभाई यांना धूळ चारली.

भूपेन्द्रभाई गांडुभाई भायाणी -
विसावदर विधानसभा मतदारसंघातून भूपेंद्र गांडुभाई भायाणी यांनी भाजपचे हर्षदकुमार माधवजीभाई रिबडिया यांना हरवले. 

आहीर हेमंतभाई हरदासभाई
जमजोधपूर विधानसभा मतदारसंघात आहीर हेमंतभाई हरदासभाई यांनी भाजपचे चिमनभाई सापरिया यांना मात दिली. 

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेतली. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने सुमारे १३ टक्के मिळाली आहेत. या मतांमुळे आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'आप'ची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय मते घेतली होती. आता, गुजरातमध्येही १३ टक्के मते घेतली. 

IPL_Entry_Point