नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीची धडक झाल्याने या भीषण अपघातात तब्बल २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ९०० प्रवाशी जखमी झाले आहे. हावडा-जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहंगा बाजार येथे रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला.
रुळावरून घसरलेले हे डबे १२८४१ शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि त्याचे डबेही उलटले. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले आणि मालगाडीचेही डब्बे रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. हावडा पासून सुमारे २५५ किमी अंतरावर असलेल्या बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे रेल्वे मंत्रालयाच्या शून्य अपघात आणि रेल्वे सुरक्षेचे दावे फोल ठरले आहे. रेल्वेने गेल्यावर्षी अपघात टाळण्यासाठी नवी प्रणाली लागू गेली होती. या प्रणालीद्वारे शून्य अपघाताचा दावा रेल्वेने केला होता. यासाठी कवचसह अनेक सुरक्षा तंत्रज्ञान लागू केल्याचा दावा रेल्वेने केला होता.
रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षी कवच तंत्रज्ञानाची चाचणी घेतली होती. या यंत्रणेची मोठी प्रसिद्धी रेल्वे मंत्रालयाने केली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः ट्रेनमध्ये बसत त्यांनी आर्मर हे रेल्वे धडक विरोधी तंत्रज्ञानाची गोडवे गात या पुढे अपघात होणार नाही असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, या तंत्रज्ञानामुळे अपघात शून्य उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल, असा दावा देखील करण्यात होता. कवच ही यंत्रणा २०२० मध्ये राष्ट्रीय स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणून स्वीकारण्यात आले. कवच हे SIL-4 प्रमाणित तंत्रज्ञान आहे, सुरक्षिततेची सर्वोच्च पातळी असलेल्या या तंत्रज्ञान मायक्रो प्रोसेसर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि रेडिओ कम्युनिकेशनच्या माध्यमातून जोडलेले असल्याचा रेल्वेचा दावा होता.
ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवलेल्या यंत्राद्वारे हे तंत्रज्ञान ठराविक अंतरावर त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन येत असल्यास स्वयंचलित ब्रेक लावण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याची चाचणी गेल्या वर्षी रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकराबाद सेक्शनवर ही चाचणी घेण्यात आली. गाड्यांची धडक रोखणे हा स्वदेशी प्रणालीचा उद्देश होता. एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर आल्यास कवच तंत्रज्ञान रेल्वेचा वेग कमी करते आणि इंजिनला ब्रेक लावते, असा रेल्वेचा दावा आहे. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांची धडक होणार नाही असा दावा करण्यात आला होता.
सरकारने २०१२ मध्ये ही प्रणाली विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि २०१४ मध्ये या प्रणालीच्या चाचण्य सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली होती की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर ही प्रणाली या रेल्वेत बसवली असेल तर ही यंत्रणा कुचकामी आहे हे सिद्ध होईल जर ही यंत्रणा या गाडीत बसवली नसेल तर ती का बसवण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होणार आहे.