मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bharat Jodo : राहुल गांधींनी लाल चौकात फडकावला तिरंगा; श्रीनगरमध्ये उद्या भारत जोडो यात्रेचा समारोप

Bharat Jodo : राहुल गांधींनी लाल चौकात फडकावला तिरंगा; श्रीनगरमध्ये उद्या भारत जोडो यात्रेचा समारोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 29, 2023 01:42 PM IST

Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir : भारत जोडो यात्रेचा आजचा अखेरचा दिवस असून राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावला आहे.

Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir
Bharat Jodo Yatra In Jammu Kashmir (HT)

Rahul Gandhi In Srinagar : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काश्मिरमध्ये पोहचली आहे. अनेक राज्यांचा प्रवास करत राहुल गांधींची पदयात्रा श्रीनगरमध्ये पोहचली असून आज त्यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावला आहे. गेल्या १४५ दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेनं १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील १९७० किलोमीटरचं अंतर कापत काश्मिर गाठलं आहे. त्यानंतर आता उद्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार असून त्यासाठी विरोधी पक्षातले अनेक बडे नेते हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काश्मिर खोऱ्यातून पदयात्रा करत राहुल गांधी आज सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. भारत जोडो यात्रा लाल चौकात येताच कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाजी सुरू केली. त्यानंतर राहुल गांधींनी लाल चौकात राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण केलं आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. देशातील १२ राज्यांमध्ये राहुल गांधी यांनी पदयात्रा करत भाजपविरोधात रान पेटवलं होतं. यात त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. द्वेष आणि कपटच्या राजकारणाला छेद देत लोकांना एकत्र येण्याचं आवाहनही राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर आता १४५ दिवसांनंतर भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे.

श्रीनगरमध्ये उद्या ३० जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी काँग्रेसनं देशातील १२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव कारणास्तव भारत जोडो यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

IPL_Entry_Point