मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Elections Result : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर डीके शिवकुमार ढसाढसा रडले, म्हणाले...

Karnataka Elections Result : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर डीके शिवकुमार ढसाढसा रडले, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 04:35 PM IST

DK Shivakumar Karnataka : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी रडत-रडत माध्यमांशी संवाद साधला.

Karnataka Congress President DK Shivakumar
Karnataka Congress President DK Shivakumar (PTI)

Karnataka Election Results 2023 Live : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत ९६ जागांवर विजय मिळवला असून भाजपाने ४५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार आणखी ४० जागांवर आघाडीवर असल्याने कर्नाटकात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं आता कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवल्यामुळं देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचं अभिनंदन करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच कर्नाटकात विजय मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेत संकटकाळात त्यांनी कशी मदत केली, हे सांगितलं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की, कर्नाटकातील आमच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. नेते आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आज काँग्रेसला मिळालं आहे. काँग्रेसच्या नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्या जातील, असा मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना विश्वास देतो, असं म्हणताच डीके शिवकुमार यांना रडू कोसळलं.

सोनिया गांधी मला तुरुंगात भेटायला आल्या होत्या...

भाजपाच्या नेत्यांनी मला तुरुंगात टाकलं होतं, त्यावेळी सोनिया गांधी या मला तुरुंगात भेटण्यासाठी आल्या होत्या, हे मी कधीही विसरू शकत नाही. तुरुंगात राहणं पसंत केलं परंतु दबावापुढे मी कधीही झुकलो नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यामुळंच आज आपला विजय झाल्याचं डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे. सिद्धरामय्या यांच्यासह अनेक नेत्यांनी बुथ पातळीवर काम केलं. काँग्रेसमधील कोणत्याही एका व्यक्तीचं नाही तर आम्हाला सामूहिक प्रयत्नांमुळंच यश मिळाल्याची भावनाही डीके शिवकुमार यांनी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point