पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. मंड्या येथे मोंदींची सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी रविवारी ११८ किलोमीटर लांब बेंगळुरु-म्हैसुर एक्सप्रेस वे योजनेचे उद्घाटन केले. यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ जवळपास तीन तासांवरून एक तास १५ मिनिटांपर्यंत कमी होईल. ८,४८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत राष्ट्रीय महामार्ग २७५ च्याबेंगळुरु-निदाघट्टा-म्हैसुरपर्यंत सहापदरी रस्ता बनवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त आहे. तर मी बेंगळुरु-म्हैसुर एक्सप्रेस वे बनवण्यात व गरीबांचे जवीनमान उंचावण्यात व्यस्त आहे. कर्नाटक राज्यात डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप सरकारच्या विविध विकास योजनांमुळे कोट्यवधी जनतेचे जीवन सुलभ झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना सुविधांसाठी सरकार दरबारी चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता देशात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पही मार्गी लागत आहेत. आगामी वर्षाच्याअर्थसंकल्पात केंद्र सरकारने अप्पर भद्रा प्रकल्पासाठी ५,३०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे सिंचनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत. उसापासून बनवलेल्या इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर आहे. म्हणजेच जास्त उत्पादन झाल्यास उसापासून इथेनॉल बनवले जाईल. इथेनॉलपासून शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल.
मंड्या शहरात मोदींचा मोठा रोड शो झाला. यावेळी लोकांची मोठी गर्दी होती तसेच पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. पीएम मोदी म्हणाले की,चांगल्या पायाभूत सुविधा जीवनसुलभ बनवतात. प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करतात. 'भारतमाला' आणि 'सागरमाला' सारख्या योजना भारताचे चित्र पालटत आहेत. हे सर्व प्रकल्प विकासाच्या मार्गाला नवी दिशा देतील. जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करण्याचा डबल इंजिन सरकारचा प्रयत्नआहे.