मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून दिल्ली विद्यापीठात राडा; पोलीस घटनास्थळी दाखल, परिसरात जमावबंदी लागू

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून दिल्ली विद्यापीठात राडा; पोलीस घटनास्थळी दाखल, परिसरात जमावबंदी लागू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 27, 2023 06:26 PM IST

BBC Documentary On Gujarat Riots : बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून जेएनयू आणि जामिया विद्यापीठात राडा झाल्यानंतर आता दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्येही वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

BBC Documentary On Gujarat Riots
BBC Documentary On Gujarat Riots (HT)

Clashes Between Student Unions In Delhi University On BBC Documentary : गुजरातमधील दंगलीवर आधारित बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलाच संघर्ष होताना दिसत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया विद्यापीठात झालेल्या वादानंतर आता दिल्ली विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाव्या संघटनांनी बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग ठेवली होती, त्यावर उजव्या विचारधारेच्या संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही संघटनांच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर आता या घटनेची माहिती समजताच दिल्ली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळं आता डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रिनींगवरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

दिल्ली विद्यापीठ प्रशासनानं गुजरात दंगलीवर आधारित असलेल्या डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रिनींगची परवानगी दिलेली नाही. परंतु तरीही काही विद्यार्थी डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींग करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला विद्यापीठातील उजव्या विचारधारेच्या संघटनांनी विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही विद्यार्थी संघटनांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. याशिवाय प्रकरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

दिल्ली विद्यापीठात झालेल्या वादाविषयी बोलताना विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, डॉक्यूमेंट्रीची स्क्रिनींगसाठी परवानगी मागण्यात आली तर त्याचा विचार केला जाईल. परंतु त्यापूर्वीच काही विद्यार्थांमध्ये वाद झाल्यानंतर व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारावर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाकडूनही कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

गोध्रा जळीतकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीवर बीबीसीनं दोन भागांची एक डॉक्यूमेंट्री प्रदर्शित केली आहे. त्यानंतर बीबीसी प्रपोगंडा पसरवत असल्याचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारनं डॉक्यूमेंट्रीच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे. सरकारच्या कारवाईनंतर अनेक प्लॅटफॉर्मवरून डॉक्यूमेंट्रीच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. परंतु आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही पार्ट्सच्या लिंक सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर यावरून वाद आणखी पेटला आहे.

IPL_Entry_Point