मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध, बिहारमध्ये रेल्वेवर दगडफेक

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध, बिहारमध्ये रेल्वेवर दगडफेक

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 15, 2022 10:48 AM IST

भारतीय लष्करात ४ वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सेवेची संधी देणाऱ्या अग्निपथ योजनेची घोषणा मंगळवारी केंद्र सरकारने केली आहे.

बक्सारमध्ये तरुणांनी रेल्वेवर केली दगडफेक
बक्सारमध्ये तरुणांनी रेल्वेवर केली दगडफेक

भारताच्या लष्करात ४ वर्षासाठी सेवेची संधी देणाऱ्या अग्निपथ योजनेची (Agneepath Bharti Yojana) घोषणा मंगळवारी केंद्र सरकारकडून करण्यात आली. मात्र या योजनेला बिहारमध्ये (Bihar) विरोध केला जात आहे. बक्सरमधील (Baxar) तरुणांना रेल्वेवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटलीपुत्र एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे काशी पटना जनशताब्दी एक्सप्रेस जवळपास १८ मिनिटे प्लॅटफॉर्मवर उभा होती. याचा प्रवाशांना त्रास झाला आणि प्रशासनाची दमछाक झाली.

मुजफ्फरपूरमध्येही लष्कराच्या भरती योजनेविरोधात तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलकांनी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या चौकात गोंधळ घातला. तरुणांनी चौकात आग लावून रास्ता रोको केला. या चौकापासून जवळ असलेल्या मैदानात लष्कराच्या ट्रेनिंगनंतर शपथविधी होतो.

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपासून शारिरीक चाचणी उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नाही. लष्कराच्या भरती कार्यालयात फेऱ्या मारल्या पण उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यासाठी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांकडेही गेलो. नोकरीसाठी वय निघून जात आहे आणि लष्कराने भरती थांबवली असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.

मुजफ्फरपूरमधील गोबरसही चौकातही आंदोलन केलं जात आहे. सदर ठाण्याजवळ असलेल्या भवनापूर गोलंबर इथं मोठ्या संख्येनं तरुण जमा झाले आहेत. आग लावून एनएच २८ वर रास्ता रोको करण्यात आला आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून आंदोलकांना समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निपथ योजना काय आहे?
अग्निपथ अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना ४ वर्षासाठी लष्करात सेवा करता येईल. त्यानंतर भविष्यात आणखी संधीही दिली जाईल. चार वर्षाच्या सेवेनंतर तरुणांना निधी पॅकेज मिळेल. या योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना चार वर्षानंतर सेवामुक्त केले जाईल. १७.५ ते २१ वर्षे वयाच्या तरुणांना यामध्ये संधी मिळेल. तसंच यांचे ट्रेनिंग १० आठवडे ते ६ महिन्यांपर्यंत असेल. १० वी, १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या