मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana: ‘सामना’ची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे; बदलत्या परिस्थितीत मोठा निर्णय

Saamana: ‘सामना’ची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे; बदलत्या परिस्थितीत मोठा निर्णय

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 05, 2022 06:18 PM IST

Uddhav Thackeray returns as Saamana Editor: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाचं मुखपत्र दैनिक 'सामना'च्या संपादकपदाची जबाबदारी हाती घेतली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर काही बदल केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'ची सूत्रे पुन्हा हाती घेतली आहेत. उद्धव ठाकरे हे यापुढं 'सामना'चे मुख्य संपादक म्हणून काम पाहणार आहेत. तर, संजय राऊत हे कार्यकारी संपादकपदी कायम आहेत.

मराठी माणसांच्या न्याय्यहकांसाठी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साप्ताहिक मार्मिक सोबत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना' हे वृत्तपत्र सुरू केलं. व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब ठाकरे हे अखेरपर्यंत सामनाचे मुख्य संपादक होते. त्यांच्यानंतर ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आली होती. मात्र, अडीच वर्षांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी संपादकपद सोडलं होतं. त्यांच्या जागी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. 'सामना'च्या प्रिंटलाइनमध्ये तसं नमूद करण्यात आलं आहे.

बाळासाहेबांनंतर संजय राऊत यांनी सामनाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. संजय राऊत यांच्या अग्रलेखांमुळं शिवसेनेची चर्चा देशभरात होत असते. पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात सामनाचा मोठा वाटा राहिला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत ईडीनं केलेल्या कारवाईमुळं संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं आहे. राऊत यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी होती. अटकेनंतर त्यांची ही जबाबदारी नीलम गोऱ्हे व अरविंद सावंत यांनी पार पाडावी, असे आदेश पक्षानं दिले आहेत. तर, सामनाची जबाबदारी स्वत: उद्धव ठाकरे यांनी हाती घेतली आहे. राऊत यांच्या अनुपस्थितीत 'सामना'ची आक्रमकता कमी होऊ नये हा यामागचा उद्देश असल्याचं बोललं जातं.

IPL_Entry_Point