मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Churchgate Renaming : चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यास विरोध का? वाचा!

Churchgate Renaming : चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यास विरोध का? वाचा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 24, 2023 12:45 PM IST

Mumbai Churchgate Railway station renaming : मुंबईतील चर्चगेट या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाला माजी मंत्री सी. डी. देशमुख यांचं नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Churchgate Railway Station
Churchgate Railway Station

Churchgate Railway station renaming : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशभरात नामांतराची लाटच आली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं तिथं नामांतराचा सपाटा लावला आहे. तर, राज्य मंत्रिमंडळानंही औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामातरांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर आता मुंबईतील ऐतिहासिक चर्चगेट रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यास विरोधही होऊ लागला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकारिणीची बैठक अलीकडंच पार पडली. त्यात चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचं नाव देण्याचा ठराव झाला होता. त्यामुळं या संदर्भातील पुढील प्रक्रिया आता सरकार दरबारी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच नामांतराला विरोध होऊ लागला आहे.

मुंबई ईस्ट इंडियन असोसिएशननं चर्चगेट स्थानकाचं नाव बदलण्यास विरोध दर्शवला आहे. अन्य काही स्वयंसेवी संस्थांनीही हाच सूर लावला आहे. चर्चगेट या नावाला एक इतिहास आहे. तो पुसला जाऊ नये, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन आणि मुंबई ईस्ट इंडियन असोसिएशननं केली आहे.

'सीडी देशमुख यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. मात्र, त्यांचं नाव इतर एखाद्या ठिकाणाला किंवा सागरी किनारा मार्गाला द्यावं, असं मत या संघटनांनी मांडलं आहे. एखाद्या जागेचं नाव बदलण्यापेक्षा त्या ठिकाणी सोयीसुविधा देण्यात याव्यात व त्यावर लक्ष केंद्रित करावं असा सल्लाही या संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यात युती सरकार असताना बॉम्बेचं मुंबई आणि व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) स्थानकाचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं होतं. त्यानंतर दादर व मुंबई सेंट्रलसह अन्य काही स्थानकांची नावं बदलण्याची मागणीही पुढं आली होती. आता थेट चर्चगेट स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा सत्ताधारी शिंदे गटानं हाती घेतला आहे. हा विषय तो तडीस नेतात का हे पाहावं लागणार आहे.

 

IPL_Entry_Point