मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं वाद; व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं वाद; व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 11:10 AM IST

Raosaheb Danve : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

Raosaheb Danve Viral Video
Raosaheb Danve Viral Video (HT)

Raosaheb Danve Viral Video : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. परंतु हा व्हायरल व्हिडिओ हा दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर स्वत:च रावसाहेब दानवेंनी खुलासा करताना म्हटलं आहे की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पूर्वीचा आहे. माझ्याकडून अनावधानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला होता. तेव्हाही माझ्याविरोधात टीका केली गेली होती. त्यावर मी माफी मागितल्यानंतर हा विषय मिटला होता. परंतु आता पुन्हा तो व्हिडिओ पुन्हा जाणीवपूर्वक व्हायरल केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय गायकवाड आणि आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी-कॉंग्रेससह शिवसेनेनं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

IPL_Entry_Point