Nitin Gadkari LIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, म्हणाले...
Nitin Gadkari Speech : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Nitin Gadkari Retirement From Politics : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धडाकेबाज पद्धतीनं विकासकामं करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गडकरी हे राजकारण सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच खुद्द गडकरी यांनी राजकारण सोडणार असल्याचं वक्तव्य अप्रत्यक्षरित्या केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी समाजकारण करण्यात रस असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता नितीन गडकरी पुन्हा राजकारण सोडणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अनेकदा लोकांना सांगितलं आहे मी निवडून आलोय, आता पुष्कळ झालं. तुम्हाला माझं काम पटलं तर मत द्या नाही तर नका देऊ. मी तुम्हाला फार लोणी लावणार नाहीये. मला समाजकारणात रस आहे. त्यामुळं मला त्या कामात जास्त वेळ द्यायचा आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा समाजकारण करण्याचं वक्तव्य केल्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक गडकरी लढणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या संसदीय समितीची घोषणा केली होती. त्यातून नितीन गडकरी यांना डच्चू देण्यात आला होता. याशिवाय भाजपच्या इतर कमिट्यांमधूनही गडकरींना हटवण्यात आलं होतं. त्यामुळं भाजपच्या शीर्ष नेत्यांवर गडकरी नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच त्यांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारवर नाव न घेता अनेकदा टीका केलेली आहे. त्यामुळं आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणातून दूर जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.