Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…

Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…

Apr 25, 2024 04:43 PM IST

Eknath Khadse : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत याबाबत संभ्रम असून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप नेतेही स्पष्ट बोलणं टाळत आहेत.

एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…
एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात… (PTI)

Eknath Khadse : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रमुख पक्ष आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच व रुसवेफुगवे सुरू आहेत. या सगळ्या धामधुमीत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची चर्चा अचानक सुरू झाली आहे. एकनाथ खडसे हे सध्या नेमके कोणत्या पक्षात आहेत आणि कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत याविषयी संभ्रम आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून ते अडगळीत पडले होते. भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात मंत्रिपद गेलेल्या खडसे हे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतूनच बाहेर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या चौकशा सुरू होत्या. या सगळ्याला कंटाळून त्यांनी पक्षांतर केलं. मात्र, त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपमध्ये राहिल्या. रक्षा खडसे यांना भाजपनं पुन्हा एकदा रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

खडसे यांना रावेरमधून लढण्याची विनंती शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली होती. खडसे यांनी त्यास नकार दिला. कालांतरानं ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आलं. त्यांनी स्वत:ही तसं सांगितलं होतं. मात्र, अद्यापही खडसे यांचा अधिकृत भाजप प्रवेश झालेला नाही.

भाजप नेते म्हणतात…

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर राज्यातील नेत्यांनी केंद्राकडं बोट दाखवलं आहे. ‘एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा अंतिम निर्णय केंद्रीय समिती करेल. तो झाला की राज्यातून आडकाठी होण्याचं कारण नाही,’ असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. तर, उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खडसे यांचे प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी खडसेंच्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. ते थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलतात. त्यामुळं माझ्या परवानगीचा प्रश्नच येत नाही,' असं गिरीश महाजन म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रश्नावर आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते आता आमच्याकडून गेले आहेत. आता त्यांचा प्रवेश कधी होईल हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपचं काही टाइमटेबल असेल ते पाहून त्यांचा प्रवेश होईल,’ असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर