मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangamner Violence : संगमनेरमध्ये दोन गटात तुफान राडा, दगडफेकीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता

Sangamner Violence : संगमनेरमध्ये दोन गटात तुफान राडा, दगडफेकीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 12:17 PM IST

Bhagwa Morcha Sangamner : हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहरात मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे.

Voilence In Sangamner City
Voilence In Sangamner City (HT_PRINT)

Violence In Sangamner City : संभाजीनगर, अकोला आणि शेवगावात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता संगमनेरमध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी संगमनेरमध्ये काढलेल्या भगवा मोर्चा संपल्यानंतर दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटातील जमावाने केलेल्या दगडफेकीत सात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता शहर तसेच जिल्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या शेवगावात दोन गटात राडा झाला होता, त्यानंतर आता संगमनेरमध्येही दोन गटात हिंसाचार झाल्याची घटना समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा मोर्चा आयोजित केला होता, मोर्चा संपल्यानंतर लोक घरी निघालेले असतानाच समनापूर येथे दोन गटात दगडफेक झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर दोन्ही गटातील लोक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाद चांगलाच पेटला. दोन्ही गटांनी एकमेकांवर केलेल्या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपींचे फोटो आम्हाला मिळाले असून प्रकरण निवळल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन केलं जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याशिवाय हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू असून कुणीही अफवा पसरवू नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर संगमनेरह समनापुरात तणावपूर्ण शांतता आहे. परिसराला छावणीचं स्वरुप आलं असून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटातील दंगेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून स्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांना अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हिंसाचाराच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी जमावाला शांत केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यामुळं आता संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव आणि संगमनेर अशा अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर येत असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point