मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेच्या पक्षचिन्हानंतर आता उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदच धोक्यात? दोन आठवड्यांची मुदत!

शिवसेनेच्या पक्षचिन्हानंतर आता उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदच धोक्यात? दोन आठवड्यांची मुदत!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 11, 2023 03:48 PM IST

Uddhav Thackeray party chief post in trouble : उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षाची मुदत १२ दिवसात संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक पेच सुरू असताना शिवसेना यावर कसा तोडगा काढणार याची सर्वांना उत्सूकता आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकनाथ शिंदे गटाने पक्षावर व पक्षचिन्हावर दावा सांगितल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या दारात गेला. सर्वोच्च न्यायालयाने याच्या निर्णयचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलावल्याने दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे व कागदपत्रे सादर करण्यात आली. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असताना व याचा निर्णय प्रलंबित असताना आता उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुख पदही धोक्यात आले आहे. त्यांच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या १२ दिवसात यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. यावर कसा तोडगा काढला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिवसेना कुणाची व पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे यावरून निवडणूक आयोगासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. दोन्ही बाजुंकडून युक्तीवाद मांडून झाला असला तरी अंतिम निर्णय झालेला नाही. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपत संपण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या २३ जानेवारी २०२३ या दिवशी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पक्षप्रमुख पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच कायम असताना पक्षप्रमुख पदाचे काय होणार याची चिंता शिवसेनेला लागली आहे.

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले की,शिवसेना पक्षप्रमुखाची निवडणूक पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं होते. वर्षानुवर्षे ही निवडणूक होत आली आहे. १९६६ पासून शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. १९६६ नंतर सर्व निवडणूका शिवसेनेनं लढवल्या आहेत. १९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं. लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत, पुढेही होतील, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

२०१८ मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीमध्ये तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी आयोगाला विनंती करणार असल्याचे समजते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या