मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri East Bypoll: शिवसेनेतील फुटीनंतर पहिलाच मोठा सामना; मुंबईतील एका जागेवर पोटनिवडणूक जाहीर

Andheri East Bypoll: शिवसेनेतील फुटीनंतर पहिलाच मोठा सामना; मुंबईतील एका जागेवर पोटनिवडणूक जाहीर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 03, 2022 01:23 PM IST

Andheri East Bypoll: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचं मतदान होणार आहे.

Shinde-Fadnavis-Thackeray
Shinde-Fadnavis-Thackeray

Andheri East Bypoll: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट-भाजप व उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणुकीच्या मैदानात प्रथमच एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं दोघांमध्ये जंगी सामना रंगणार आहे. यात कोण बाजी मारणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली. तसंच, निवडणुकीची मतमोजणी सहा नोव्हेंबरला होणार आहे. सात ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर ही आहे. १५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबर आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेसाठी शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली गेल्यामुळं एकनाथ शिंदे गटानं ही जागा सोडली आहे. भारतीय जनता पक्षानं मात्र ही जागा शिवसेनेकडून खेचून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. मूरजी पटेल यांनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पटेल यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. त्यात शिंदे गटाची साथ लाभल्यानं भाजपला येथून विजयाचा विश्वास आहे.

शिवसेना कोणत्या चिन्हावर लढणार?

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर एकनाथ शिंदे गटानं दावा केला आहे. त्याबाबतचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. पोटनिवडणुकीच्या आधी यावर निर्णय न झाल्यास शिवसेना कोणत्या चिन्हावर लढणार याविषयी देखील संभ्रम आहे.

 

IPL_Entry_Point