मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milind Narvekar: शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट

Milind Narvekar: शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांचं ट्वीट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 03, 2022 12:14 PM IST

Milind Narvekar: एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असलेले उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी आज एक ट्वीट केलं आहे.

Milind Narvekar - Uddhav Thackeray
Milind Narvekar - Uddhav Thackeray

Milind Narvekar at Shivaji Park: दसरा मेळाव्यावरून शिवसेनेतील दोन गटांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलं असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्वीट केलं आहे.

काही वर्षांपूर्वी शिवसेना सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. शिवसेनेतून बाहेर पडताना यापूर्वी अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यावर टीका केली होती. या सर्वांचं प्रमुख लक्ष नार्वेकर हेच होते. मात्र, उद्धव हे नेहमीच नार्वेकर यांच्या पाठीशी उभे राहिले. इतकंच नव्हे तर शिवसेनेत नार्वेकर यांचं महत्त्व वाढतच गेलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना तिरुपती देवस्थानाच्या सदस्यपदाची संधी दिली. तेच नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. शिंदे गटाचे एक मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं ही चर्चा रंगलीय. त्यावर नार्वेकर यांनी कुठलंही भाष्य केलेलं नसलं तरी त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचं बोललं जातंय.

नार्वेकर यांनी आज सकाळी हे ट्वीट केलं आहे. '५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसंच, इथं असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचं दर्शन घेतलं, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सोबत त्यांनी शिवतीर्थावरील काही फोटोही शेअर केले आहेत. राजकीय तर्कवितर्कांना त्यांनी या ट्वीटमधून पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले होते?

मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल खुद्द एकनाथ शिंदे यांनाही पत्रकारांनी विचारलं होतं. मात्र, आपल्याला याबद्दल काही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

IPL_Entry_Point