मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गाव का बच्चा बच्चा जानता है… ‘सामना’नं सांगितला शिंदेंच्या शरणागतीचा घटनाक्रम

गाव का बच्चा बच्चा जानता है… ‘सामना’नं सांगितला शिंदेंच्या शरणागतीचा घटनाक्रम

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 03, 2022 10:54 AM IST

Saamana Editorial slams Eknath Shinde: ईडीला घाबरून आमच्याकडं कुणीही आलेलं नाही असं म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Eknath Shinde - Uddhav Thackeray

Saamana Editorial slams Eknath Shinde: शिवसेना व एकनाथ शिंदे गटातील शाब्दिक चकमकी सुरूच असून संजय राऊत यांच्या अटकेनंतरही शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून शिंदे आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. ईडीला घाबरून आमच्याकडं किंवा भाजपमध्ये जाऊ नका असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडंच केलं होतं. त्याचा सामनाच्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आमच्याकडं आलेले आमदार, खासदार ईडीला घाबरून आलेले नाहीत. त्यामुळं यापुढंही कुणी घाबरून आमच्याकडं येऊ नका असं मुख्यमंत्री औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. 

'मुख्यमंत्र्यांना ४० आमदारांचं समर्थन आहे. त्यांचं हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतलं तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गानं गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे. शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाड्या ‘ईडी’नं आवळताच स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. महाविकास आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळालं असतं तर आज राष्ट्रवादीवर टीका करणारे हे महाशय त्यांचं गुणगाण करताना दिसले असते. शिंदे यांना येनकेन मार्गानं मुख्यमंत्रीपद हडपायचं होतं. भाजप-ईडी युतीनं त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

हिंदुत्व हा महत्त्वाचा विचार आहेच, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. त्याच मराठी अस्मितेवर व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अपमानाच्या गुळण्या टाकण्याचं काम राज्यपाल महोदयांनी केलं, पण शिंदे यांनी त्यावर गप्प बसणं पसंत केलं. महाराष्ट्राचा अपमान सहन करा व शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कुणी नख लावत असेल तर चवताळून उठा, अपमान करणाऱ्याच्या नरडीचा घोट घ्या, हाच बाळासाहेबांचा विचार आहे व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना शिंदे यांनी त्या विचारांशी प्रतारणा केली, असा आरोपही करण्यात आला आहे.

चोरीच्या  मालावर सुरू केलेलं दुकान फार काळ चालत नाही!

'मुळात भाजपच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगानं आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडं किंवा भाजपकडं येऊ नका असं सांगणं म्हणजे दोघांचंही दुकान कायमचं बंद करण्यासारखं आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेलं दुकान फार काळ चालत नाही, अशी बोचरी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग