मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Savarkar Row: ‘सावरकरांचा सन्मान होईल असं एकही काम मोदी-फडणवीसांनी केलेलं नाही; 'सामना'तून थेट वार

Savarkar Row: ‘सावरकरांचा सन्मान होईल असं एकही काम मोदी-फडणवीसांनी केलेलं नाही; 'सामना'तून थेट वार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 19, 2022 12:06 PM IST

Saamana Slams BJP over Savarkar Controversy: सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यासोबत शिवसेनेवरही टीका करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.

Savarkar
Savarkar (Sandeep Mahankal)

Shiv Sena on Savarkar Controversy: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे. भारतीय जनता पक्ष व शिंदे गटानं राहुल यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही घेरलं आहे. भाजपच्या या टीकेला शिवसेनेचं मुखपत्र सामनातून सणसणीत उत्तर देण्यात आलंय. त्याचवेळी भाजपच्या हाती आयतं कोलीत देणाऱ्या राहुल गांधी यांचेही कान टोचले आहेत.

'वीर सावरकर' अशा शीर्षकानं 'सामना'त अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यात इतिहासाचे दाखले देत भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. 'भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे सावरकर प्रेम अचानक उफाळून आलं आहे, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरं झालं असतं. सर्व उत्तम चाललं असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती. त्यामुळं नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता. तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळं सावरकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचं सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचं तर काय? वीर सावरकरांचा सन्मान होईल असं एकही काम फडणवीस – मोदी यांनी केलेलं नाही, पण राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात,' अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

राहुल गांधींच्या मनातील सावरकरद्वेष आधी नष्ट व्हायला हवा!

वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नाही. देशातील द्वेषाचं वातावरण, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर लोकांना जागे करण्यासाठी ही यात्रा आहे. भाजप कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी त्यांना या यात्रेची दखल घ्यावी लागली आहे. राहुल गांधी यांचे कष्ट त्यामागे आहेत; पण अचानक वीर सावरकरांच्या नावानं त्यांचं मन अस्थिर होतं व सर्व केलेल्यावर पाणी पडते. असं का व्हावं?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे. राहुल यांची यात्रा देशात पसरत चाललेल्या तिरस्कार व द्वेषाच्या राजकारणाविरोधात आहे, पण वीर सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधींच्या मनात ठासून भरलेला तिरस्कार आधी नष्ट व्हायला हवा. महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील, असंही शिवसेनेनं ठणकावलं आहे.

IPL_Entry_Point