मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray : आमच्याशिवाय त्यांचं दुकानच चालणार नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Aaditya Thackeray : आमच्याशिवाय त्यांचं दुकानच चालणार नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 16, 2023 03:03 PM IST

Aaditya Thackeray on Eknath Shinde Camp : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाला गद्दार म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray Slams Eknath Shinde Camp : ‘शिवसेना ही एकच आहे. गद्दार गट आमचं नाव आणि चिन्हच काय, आमचा चेहराही चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याशिवाय त्यांचं दुकान सुरूच होऊ शकत नाही,’ अशा शब्दांत शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला.

शिवसेना भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेतील रस्ते विकासाच्या कामांमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. त्याच विषयावर त्यांनी आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारला. ‘काल गोडगोड बोलण्याचा दिवस होता. परखड बोलता येणार नव्हतं, म्हणून मी पत्रकार परिषद घेणं टाळलं. आज त्याच घोटाळ्याबाबत मी प्रश्न मांडत आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर असून त्यावर सुनावणी सुरू आहे. या अनुषंगानं आदित्य ठाकरे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत सविस्तर बोलण्याचं त्यांनी टाळलं. मात्र, शिंदे गटाला टोला लगावण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

‘आमच्याशिवाय गद्दारांचं दुकानच चालणार नाही. आमचं नाव आणि चिन्हच काय, ते चेहराही चोरत आहेत. त्यामुळंच दररोज उठून ते आमच्यावर बोलतात, पण आम्ही लोकांच्या विषयावर बोलणार. हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे आणि तो लोकांसमोर आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरही टिप्पणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळं महाराष्ट्रात प्रकल्प येतील का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता, 'मी त्यावर आत्ताच बोलणार नाही. दौरा पूर्ण होऊ द्या. मुख्यमंत्र्यांना मनमोकळेपणे फिरू द्या, मग मी त्यावर बोलेन, असा टोला आदित्य ठाकरे यांनी हाणला.

IPL_Entry_Point