मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपच्या तिजोरीत येणारे पैसे ही सुद्धा भीक आहे का?; संजय राऊत यांचा रोकडा सवाल

भाजपच्या तिजोरीत येणारे पैसे ही सुद्धा भीक आहे का?; संजय राऊत यांचा रोकडा सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 10, 2022 12:43 PM IST

Sanjay Raut Slams Chandrakant Patil: फुले व आंबेडकरांनी भीक मागितली असं म्हणणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut Slams Chandrakant Patil: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरून महाराष्ट्रभरात भाजपच्या विरोधात संतापाची लाट असतानाच आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटीला यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता विरोधकांनी पाटलांसह भाजपलाही घेरलं आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडं भीक मागितली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला आहे. संजय राऊत यांनी आज पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांना आदर्श मानत नाहीत. ज्या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. ज्या पक्षाचे मंत्री आणि प्रवक्ते शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, त्याच पक्षाचा हा वंश आहे. हे सगळे अकलेचे कांदे आहेत,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

‘कोणी भीक मागितली? तुमच्या पक्षाच्या तिजोरीत जे पैसे येतात, ती सुद्धा भीक आहे का? महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी तुम्ही जे खोके वाटले, तीही भीकच होती का?,’ असा सवाल राऊत यांनी केला.

‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. महात्मा फुले यांनी आपली संपत्ती शाळा, महाविद्यालये व दानधर्मासाठी वापरली. त्यांची संपत्ती टाटांपेक्षाही एकेकाळी जास्त होती. टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा फुल्यांचं उत्पन्न २१ हजार होतं, अशी इतिहासात नोंद आहे. हे भाजपवाल्यांना माहीत नाही. हे महाराष्ट्राच्या दैवतांना कधी भिकारी, कधी माफीवीर म्हणतात. दुर्दैवानं हे आमचे राज्यकर्ते आहेत. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील व महाराष्ट्राची माफी मागावी लागेल,’ असा इशारा राऊत यांनी दिला.

IPL_Entry_Point