मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 19, 2022 06:34 PM IST

मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा उभारणारे संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.

उद्धव ठाकरे-संभाजीराजे भोसले
उद्धव ठाकरे-संभाजीराजे भोसले

राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. आज संभाजीराजेंनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीचा संबंध थेट राज्यसभेच्या निवडणुकीशी जोडला जात आहे.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. संख्या बळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकणार आहेत. एकच उमेदवार निवडून आणण्याची ताकद असतानाही शिवसेनेनं दोन उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. तर, याआधी राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले संभाजीराजे भोसले यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर उरलेली मतं संभाजीराजेंना देण्याची घोषणा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. संभाजीराजेंनीही आपल्या परीनं मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही त्यांना आशा आहे. मात्र, शिवसेनेनं दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यानं त्यांच्या पुढं अडचण निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे व मुख्यमंत्र्यांची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना थेट पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी ऑफर शिवसेनेकडून देण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यावरही आजच्या भेटीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी एका उमेदवाराला ४२ मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. भाजपकडं सध्या ११३ आमदारांचं बळ आहे. त्यात भाजपचे १०६ आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीकडं १६९ आमदार आहेत.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजीराजे भोसले हे आघाडीवर होते. अनेक जिल्ह्यांत मोर्चे काढून व आंदोलनं करून त्यांनी आरक्षणाचा प्रश्न धगधगत ठेवला होता. त्याचवेळी आंदोलन हाताबाहेर जाऊ न देण्याची खबरदारीही त्यांनी घेतली होती. मराठा समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांना याचा कितपत फायदा मिळतोा, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग