मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Ramdas Athavale Say Our Great Love For Cheetahs If We Get One Of The Cheetahs

Ramdas Athavale : मोदींनी आणलेले चित्ते पाहायला जाणार अन् एखादा मिळाला तर घेऊन येणार - आठवले

रामदास आठवले
रामदास आठवले
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Sep 25, 2022 11:20 PM IST

रामदास आठवले म्हणाले की,नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्वजण या जंगलामधले चित्ते आहोत. आम्ही चित्ते असल्यामुळे आम्हाला आमचं काम फत्ते करायचं आहे.

पुणे – केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवले (Ramdas Athavale) आज पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नामिबियातून भारतात आणलेले ८ चित्ते व शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आपली मते व्यक्त केली. आठवले म्हणाले की, चित्त्यांवर (Cheetah)आमचं जबरदस्त प्रेम असून पंतप्रधान मोदींनी नामिबियातून आणलेले चित्ते मी पाहायला जाणार आहे  आणि त्यातला एखादा मिळाला तर घेऊन येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, सध्या शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याने दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हा शिंदे गटाचाच आहे.

त्याबरोबर भारताच्या मिशन चित्ताबाबत रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आफ्रिकेतून आणलेले चित्ते मी अजून पाहिले नाहीत. मात्र नॅशनल पार्कमध्ये असलेला चित्ता मी सहा वर्षापासून दत्तक घेतला आहे. त्याचा सर्व खर्च मी करतो. चित्ता या प्राण्याबद्दल आम्हाला जबरदस्त आकर्षण व प्रेम आहे. कारण दलित पँथरच्या चळवळीमधील जो पँथर होता तो चपळ असा चित्ता होता. आता जे चित्ते भारतातआणले आहेत, ते मोदींच्या वाढदिवसादिवशी मध्यप्रदेशमधील जंगलात सोडले आहेत. त्यांचे फोटो देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. मी ते चित्ते फोटोत पाहिले आहेत. मी सुद्धा ते चित्ते पाहण्यासाठी जाणार आहे. त्यातला एखादा चित्ता जर मला मिळाला तर तो मी घेऊनही येणार आहे.

 

रामदास आठवले म्हणाले की, चित्ते भारतीय जंगलामध्ये राहणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्वजण या जंगलामधले चित्ते आहोत. आम्ही चित्ते असल्यामुळे आम्हाला आमचं काम फत्ते करायचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नामिबियातून भारतात चित्ते (Project Cheetah) आणण्यात आले आहेत. हे चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या