मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Women's Day 2023: महिलांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक; राज ठाकरेंची खास पोस्ट

Women's Day 2023: महिलांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक; राज ठाकरेंची खास पोस्ट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2023 12:39 PM IST

Raj Thackeray: जागतिक महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकवर खास पोस्ट लिहली आहे.

Raj Thackeray MNS
Raj Thackeray MNS (HT)

International Women's Day 2023: आज जगभरात विविध प्रकारे महिला दिन साजरा केला जात आहे. हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून महिलांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. तसेच राजकारणात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त राज ठाकरे यांनी महिलांसाठी खास फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

पुढे राज ठाकरे म्हणातात, “१००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आज त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे."

“आता स्त्रियांनी राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे. हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे”, असे आवाहन राज ठाकरे यांनी महिलांना केले आहे.

IPL_Entry_Point